माजलगाव : येथील नगरपालिका अंतर्गत विविध रस्त्याचे काम न करताच तत्कालीन मुख्याधिकारी बी. सी. गावित व नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी 1 कोटी 61 लाख रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी 14 महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. यानंतर फरार झालेले गावित शुक्रवारी पहाटे आष्टी पोलीसात स्वतः होऊन हजर झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, 2016 पुर्वी असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या काळात विविध रस्त्यासाठी 1 कोटी 61 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. नंतर तत्काळ नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या. त्यानंतर सहाल चाऊस हे नगराध्यक्ष झाले होते. त्यावेळी मुख्याधिकारी बी.सी.गावीत हे माजलगाव नगरपालिकेत कार्यरत होते. सहाल चाऊस, गावित आणि लेखापाल यांनी 2017 मध्ये संगनमत करून रस्त्यासाठी 1 कोटी 61 लाख रुपयाचा निधी काम न करताच उचलला.
तब्बल दोन वर्षानंतर डिसेंबर 2019 साली प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी विवेक जाँनसन यांच्या निदर्शनास हा अपहार आला. त्यांनी मुख्याधिकारी व दोन लेखापालांविरूध्द अपहाराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर गावीत हे फरार झाले होते. मार्च 2020 मध्ये नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना देखील आरोपी करत त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक झाली होती. त्यांना पंधरा दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयातुन जामीन मिळाला आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी आष्टी येथील पोलीस ठाण्यात मुख्याधिकारी गावित स्वतःहून हजर झाले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.