- नितीन कांबळे
कडा (बीड ) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ वरील अहमदनगर -कडा- जामखेड-बीड या रस्त्याची दुरूती व मजबुतीकरण झाले असून साबलखेड ते चिचपुर असा २० किलोमीटरचा रस्ता मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्षित राहिल्याने त्यावर मोठमोठी खड्डे पडली आहेत. यामुळे या मार्गावर अनेक अपघात होऊन जीवितहानी झाली. दरम्यान, कडा येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर देशमुख यांनी थेट नागपूर येथे जाऊन केंद्रिय दळणवळण व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यावेळी गडकरी यांनी ८ दिवसात रस्त्याचे काम होईल असे आश्वासन दिले होते. आठ दिवसांची डेडलाईन उलटली मात्र, तीन आठवड्याने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम आता सुरु झाल्याने प्रवास्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
याच रस्त्यावरून हैदराबाद, कर्नाटक येथील भाविक, प्रवाशी प्रवास करतात. पण मागील वर्षांपासून रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असताना संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. हाच धागा धरून कडा येथील भाजपाचे जिल्हा सचिव शंकर देशमुख यांनी थेट नागपूर येथे जाऊन केंद्रीय दळणवळण व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन हा जिव्हाळ्याचा विषय पोट तिडकीने मांडला. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांना सुचना देत आठ दिवसात या महामार्गावरील खड्डे बुजवण्यात येतील असे आश्वासन दिले होते. गडकरी यांनी त्या आश्वासनाची पूर्तता केली असून आज या महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच या मार्गावरून सर्वांचा सुखद प्रवास होणार आहे.