- नितीन कांबळे
कडा ( बीड): नगर ते आष्टी या ६१ किलोमीटर मार्गावर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात नियमित प्रवाशी रेल्वे सुरु होणार असल्याची माहिती आहे. २५ किंवा २६ एप्रिल रोजी रेल्वे सेवा सुरु होणार आहे. जवळपास तीस वर्षाच्या प्रतिक्षेनंतर समस्त बीडकरांचे प्रवाशी रेल्वेचे स्वप्न पूर्ण होणार असल्याने जिल्ह्यात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
२९ डिसेंबर २०२१ रोजी नगर ते आष्टी या ६१ किलोमीटर मार्गावर रेल्वेची यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी प्रवासी रेल्वे सुरू होण्याचा मुहूर्तही ठरला होता. परंतु, अचानक हा मुहूर्त लांबला. आता २५ किंवा २६ एप्रिल पासून प्रवाशी रेल्वे नियमित सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बीड जिल्ह्याला रेल्वे येण्यासाठी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या रेल्वेमार्गासाठी विशेष लक्ष देऊन भरीव निधीची तरतूद करण्यात आली. या मार्गासाठी केंद्र आणि राज्याने समसमान निधी आजपर्यंत दिलेला आहे. आता आष्टी ते नगर रेल्वे नियमित सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
१९८२-८३ पासून रेल्वेसाठी समितीमार्फत सातत्याने आंदोलने करण्यात आली. याला यश आले असून प्रवाशी रेल्वेचे स्वप्न पूर्ण होतंय ही आनंदाची बाब आहे. - नामदेव क्षीरसागर, निमंत्रक, स्वातंत्र्यसैनिक रेल्वे मागणी आंदोलन समिती