अंबाजोगाई : मागील एक वर्षापासून ते २६ एप्रिल २०२१ या कालावधीत शासन निर्देशानुसार ५३७ मृत कोरोनाबाधित रुग्णांच्या पार्थिवावर अंबाजोगाई नगर परिषदेकडून अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. ही जबाबदारी सांभाळतानाच कोविड रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरला दररोज लागणाऱ्या आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
प्रभारी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंबाजोगाई नगर परिषद पुढाकार घेत जनजागृती, प्रबोधन करत आहे. कोरोना नियंत्रणासाठी नियमित स्वच्छता, पाणीपुरवठा, शासन निर्देशानुसार ज्या कार्यालयात बाधित कर्मचारी आढळून आले, ती शासकीय कार्यालये, शाळा यासोबतच ज्या कुटुंबांत बाधित रुग्ण आढळून आले तेथील राहते घर व निवासी जागा येथे सॅनिटायझर फवारणी केलेली आहे.
दहा लाख ५० हजार लीटर एवढा पाणीपुरवठा
अंबाजोगाई नगरपालिकेकडून टी. बी. गिरवलकर कॉलेज सी.सी. यांना ४०० गाद्या, ४३० उशा, ४०० चादरी, ४० मोठे डस्टबीन, १५० छोटे डस्टबीन, १५ नवीन पाणी जार, ६० मोठी बकेट, ४९ छोटी बकेट, ७१ मग, २४ वायपर, २२ पोछा, ४२ टॉयलेट ब्रश तसेच आवश्यकतेनुसार मास्क व सॅनिटायझर आणि स्वच्छता विषयक पूर्ण साहित्य देण्यात आले आहे. तसेच जारद्वारे पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले आहे. लोखंडी सावरगाव कोविड सेंटर, टी. बी. गिरवलकर कॉलेज सी.सी., भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह येथील कोविड केअर सेंटरच्या स्वच्छतेसाठी दररोज दोन घंटागाड्या कार्यान्वित आहेत. ट्रॅक्टरही स्वच्छतेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. २८ मार्चपासून कमी-अधिक प्रमाणात आवश्यकतेनुसार दररोज टँकरद्वारे नियमित पाणी देण्यात येते. २८ मार्च २०२१ ते २६ एप्रिल २०२१ या कालावधीत टँकरच्या १२७ खेपांद्वारे तब्बल १० लाख ५० हजार लीटर एवढा पाणीपुरवठा करण्यात आला असून, चार दिवसांपासून लोखंडी सावरगाव येथील कोविड केअर रुग्णालयास पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृहाची पूर्णपणे स्वच्छता, सॅनिटायझर फवारणी केली असून दररोज घंटागाडीद्वारे येथील कचरा संकलित करण्यात येतो. गरजेनुसार एल.ई.डी. बल्ब बसवून विद्युत व्यवस्था केलेली आहे.
कोविड संकटकाळात अंबाजोगाई नगर परिषदेने मदत आणि सुविधेसाठी वाटा उचलला आहे. अंबाजोगाईकरांनी मास्क व सॅनिटायझरचा नियमित वापर करून, गर्दीत जाणे टाळून, आपले हात नियमितपणे स्वच्छ धुवावेत, लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात यावी आणि कोरोना पार्श्वभूमीवर शासन निर्देशांचे व कायद्याचे पालन करावे.
- राजकिशोर मोदी, प्रभारी नगराध्यक्ष, न. प. अंबाजोगाई.