: अटकेसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या
अंबाजोगाई : शहरातील मोरेवाडी परिसरात १ मार्च रोजी सायंकाळी गणेश सुंदरराव मोरे (वय २१) या तरुणाचा भर रस्त्यात निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी तीन अल्पवयीन आरोपींसह पाच जणांवर कट रचून खून केल्याचा गुन्हा रात्री उशिरा अंबाजोगाई शहर ठाण्यात नोंदविण्यात आला. त्यातील फरार झालेल्या दोन आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात मंगळवारी दिवसभर ठिय्या दिला. अखेर सायंकाळी साडेपाच वाजता तणावपूर्ण वातावरणात गणेशच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याप्रकरणी मयत गणेशचे वडील सुंदरराव महादेव मोरे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार, सात महिन्यापूर्वी प्रतीक प्रदीप तरकसे याने गणेश मोरे, पवन मोरे आणि इतरांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार अंबाजोगाई शहर ठाण्यात दिली होती. त्यात ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल होऊन अटक झाल्यानंतर काही दिवसांनी गणेश आणि इतरांची जामिनावर मुक्तता झाली होती. त्यानंतर प्रदीप तरकसे, अमोल लक्ष्मण पौळे आणि दोन अल्पवयीन आरोपी हे अधूनमधून त्यांच्याकडे आणि गणेशकडे येत असत. दोन लाख रुपये दे, आम्ही केस मिटवून घेतो. अन्यथा तुला, तुझ्या मुलाला जीवे मारून टाकू अशी धमकीही त्यांनी दिली होती.
या कारणावरून सोमवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास प्रदीप तरकसे, अमोल पौळे आणि एका अल्पवयीन आरोपीच्या सांगण्यावरून मोरेवाडीतील जयभीम नगर आणि उज्वल विद्युत नगरमधील दोन अल्पवयीन आरोपींनी गणेश मोरे यास तलवार, विटा आणि दगडांनी मारहाण करून त्याचा खून केल्याचे सुंदरराव मोरे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. सदर फिर्यादीवरून प्रदीप तरकसे, अमोल पौळे आणि तीन अल्पवयीन आरोपींवर कट रचून खून केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार करत आहेत. खून केल्यानंतर ते दोन अल्पवयीन आरोपी स्वतः अंबाजोगाई शहर ठाण्यात हजर झाले. तिसऱ्या अल्पवयीन आरोपीस पोलिसांनी जयभीमनगर येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले.
आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईकांचा ठिय्या
उर्वरित दोन सज्ञान आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी करत मयत गणेश मोरेच्या संतप्त नातेवाईकांसह शेकडो मोरेवाडी ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत शहर पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी अमोल पौळे या आरोपीस ताब्यात घेतले असल्याचे समजते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर सकाळपासूनच शहर पोलीस ठाण्यात ठाण मांडून होत्या. संतप्त जमावाला शांत राहण्याचे व तपासात सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.