कडा : अमिया नावाच्या महिलेने फार वर्षांपूर्वी ही जमीन ग्रामपंचायतीला दान म्हणून दिली होती. ही जमीन गायरान म्हणून राहिल्याने भूमिहीन, गोरगरीब लोकांसाठी ते क्षेत्र तसेच राहिले; पण आता याच गायरान जमिनीसाठी अनेक जण दावा करत आहेत. ‘तुझं नाही माझंच’ म्हणत गायरान जमिनीसाठी वाद झडत आहेत. या वादामुळे पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून प्रतिबंधासाठी नोटीस जारी केल्या आहेत.
टाकळी अमिया या गावात फार वर्षांपूर्वी ‘अमिया’ नावाच्या महिलेने जमीन ग्रामपंचायतीला दान म्हणून दिली होती. ग्रामपंचायतीने ती दान जमीन गायरान म्हणून गावासाठी राखीव ठेवली. कालातंराने भूमिहीन, गोरगरीब, अनुसूचित जाती, जमातीतील काही लोकांनी ही जमीन वहिती केली. आता या गायरानावर मालकी हक्क कोणाचा हा प्रश्न उपस्थित राहिला आहे. पारधी समाजातील व मागासवर्गीय, वडार समाजातील काही लोक ही जमीन आमचीच असल्याचा हक्क दाखवत असल्याने रोजच वाद निर्माण होत आहेत. जर हा वाद वेळेतच मिटला नाही तर किरकोळ ठिणगीचे रूपांतर मोठ्या भांडणात होऊ शकते. या वादामुळे पोलिसांचीही डोकदुखी वाढत आहे. गायरानाचा वाद आता ग्रामपंचायतीने बैठक बोलावून मिटवायला हवा, असे बोलले जात आहे.
प्रतिबंधक कारवाई करणार
याबाबत आष्टीचे उपाधीक्षक विजय लगारे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, याप्रकरणी दखल पात्र अपराधाला प्रतिबंध करण्यासाठी नोटीस दिल्या असून दोन दिवसांत प्रतिबंधक कारवाया करण्यात येणार आहेत.
महसूल, पोलीस प्रशासन थेट गायरानात
टाकळी अमिया येथील गायरान जमिनीवरून वादाला तोंड फुटत असल्याचे प्रशासनाच्या कानावर जाताच भविष्यात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शनिवारी तहसीलदार राजाभाऊ कदम, नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे, सहायक पोलीस निरीक्षक विजय देशमुख, मंडळाधिकारी गवळी यांच्यासह मोठ्या प्रमाणावर महसूल व पोलीस प्रशासनाचा फौजफाटा थेट गायरानात दाखल झाला होता.
110921\11_2_bed_16_11092021_14.jpg~110921\screenshot_20210911-094609_video player_14.jpg
कडा पोलीस~