सोमनाथ खताळबीड : प्रभू श्रीरामांचा बहुप्रतीक्षित प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी अयोध्येत मोठ्या थाटात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या सोहळ्यातील मोजक्या पुरोहितांमध्ये बीडचे भूमिपुत्र वेदशास्त्र संपन्न गजानन दिलीपराव ज्योतकर यांचा सहभाग होता. ज्योतकर यांनी मंत्रोच्चार करण्यासह पंतप्रधान मोदी यांना टिळा लावणे व इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. ज्योतकरांना हा मोठा सन्मान मिळाल्याने बीडची मान उंचावली आहे.
आई-वडिलांना अभिमानसोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत गजानन यांच्या कर्तृत्वाबद्दल कोणालाच काही माहिती नव्हती; परंतु जेव्हा पूजेला सुरुवात झाली आणि त्याचे थेट प्रक्षेपण दिसू लागले, तेव्हा अनेकांनी गजानन यांना ओळखले. त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधला. काही लोकांनी त्यांची आई कावेरी आणि वडील दिलीपराव ज्योतकर यांना माहिती दिली. आपल्या मुलाचे कर्तृत्व पाहून आई-वडिलांचा ऊर अभिमानाने भरून आला. हा आनंद शब्दांत व्यक्त करता येणारा नाही, असे कावेरी व दिलीपराव ज्योतकर यांनी सांगितले.
बारा वर्षांपूर्वी वेदशास्त्र संपन्नबीड तालुक्यातील कळसंबर या खेडेगावातील गजानन ज्योतकर हे १२ वर्षांपूर्वी वेदशास्त्र संपन्न झाले. ते सध्या काशी येथे वास्तव्यास असून संस्कृत विषयात पीएच.डी. करत आहेत. याचदरम्यान त्यांना अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले. त्यांनी आपले गुरू गणेश द्रविड शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली होकार दिला. त्याप्रमाणे देशातील इतर १२१ पुराेहितांचेही नियोजन केले. सोमवारी गणेश द्रविड शास्त्री, दीक्षित महाराज, केशव आयाचित, शांतारामशास्त्री भानुसे यांच्या आधिपत्याखाली प्रभू रामलल्लाच्या गर्भगृहात प्राणप्रतिष्ठेदरम्यान ज्योतकर यांचा सहभाग होता.
गजानन हा माझा लहान भाऊ आहे. अयोध्येत जाणार हे दिवाळीत आला तेव्हा बोलला होता; परंतु तेथे मुख्य पूजेच्या ठिकाणी सहभाग असेल, याची कल्पना नव्हती. जेव्हा अयोध्येमध्ये पूजेला सुरुवात झाली, तेव्हा हे समजले. माझ्या लहान भावाला एवढा मोठा सन्मान मिळाल्याने आम्ही आनंदी आहोत. - दीपक ज्योतकर, गजानन यांचे मोठे भाऊ.