परळी: संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी व आषाढी वारीमूळे वैद्यनाथाच्या परळी नगरीत आज भक्तीसोहळा रंगला. त्यामुळे शहरात चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले होते. टाळ -मृदंगाच्या तालावर भजन करत गण गण गणात बोते, विठ्ठल नाम आणि माऊलीचा वारकरी जयघोष करीत होते.
संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे परळी शहरात मंगळवारी सकाळी उड्डाणपूलावरून आगमन झाले. शहरात ठीक ठिकाणी या पालखी सोहळ्याचे स्वागतकरून हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. स्वागतासाठी शहरात पालखी मार्गावर नागरिक सज्ज झाले होते. शेगाव येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे परळीमार्गे निघालेल्या संत गजानन महाराज पालखीवारीचे गंगाखेडहून परळीच्या शक्तीकुंज वसाहतमध्ये आज दुपारी आगमन झाले. पालखी मार्गात अल्पोपहार,चहापाणी, पिण्याचे पाणीची व्यवस्था विविध सामाजिक संघटनेच्यावतीने करण्यात आली.
पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती ही पालखी ,पायी वारी राणी लक्ष्मी बाई टॉवर ,नेहरू चौक मार्गे वैद्यनाथ मंदिर व वैद्यनाथ मंदिर मार्गे संत जगमित्र नागा मंदिर येथे आली, या ठिकाणी गजानन महाराजांच्या पालखीची पूजा श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्ट सेक्रेटरी राजेश देशमुख यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. यावेळी संत जगमित्रनागा मंदिराचे पुजारी औटी परिवार उपस्थित होता.गजानन महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी दिवसभर भाविकांची रीघ लागली होती. आज संत जगमित्र नागा मंदिर परिसरात पालखी मुक्कामी असून बुधवारी पहाटे कण्हेरवाडी मार्गे आंबाजोगाईकडे प्रस्थान होईल. मंगळवारी चांदूरबाजार येथील संत गुलाब महाराज पालखी चे परळीत आगमन झाले , देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथाच्या परळी नगरीतून विदर्भातील अनेक दिंड्या आषाढीवारीसाठी परळी मार्गे पंढरपूरकडे जातात.