धारुर : तालुक्यातील चोरंबा येथील गणेश बाबासाहेब चव्हाण यांच्या क्रेडिट कार्डवर खरेदी करून परस्पर वापरून ८६ हजार ९०० रुपयानी चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला. काही दिवसापूर्वी तालुक्यातील जहागीरमोहा येथील रमेश पांडुरंग मंदे यांच्या चोरीला गेलेल्या मोबाईलमधून ९८ हजार रुपये फोन पेद्वारे काढण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच चोरंबा येथील नागरिक गंडविला गेला. ४,९०९ रुपये व्याजाचे कपात झाल्याचे सांगण्यात आले, मात्र ८२ हजार रुपये कार्डचा वापर न करता कपात कसे झाले, यामुळे बँकेत तक्रार देण्यात आली आहे.
तालुक्यातील चोरंबा येथील गणेश बाबासाहेब चव्हाण यांचे धारुर येथील भारतीय स्टेट बँक शाखेत खाते असून, त्यांनी बँकेकडून क्रेडिट कार्ड घेतले होते. सदरील कार्डचा त्यांनी कसलाही वापर केलेला नाही. त्यांच्या खात्यामध्ये १६ डिसेंबर रोजी २ लाख ५९ हजार ५०० रुपये उसाचे बिल जमा झाले. तसेच १८ जानेवारी रोजी ७२ हजार ६५० रुपये डाळिंबाची विमा रक्कम जमा झाली होती. एकूण रक्कम ३ लाख २ हजार १५० रुपये जमा झाली होती. मात्र या कार्डच्या बिलामधून १३ जानेवारी खात्यामधून ८६ हजार ९०९ रुपये कपात झाले. यामुळे भारतीय स्टेट बँकेच्या धारुर शाखेत गणेश चव्हाण यांनी कपात रकमेबद्दल चौकशी केली. यासंदर्भात लेखी तक्रार दाखल करून संबंधितावर कारवाई करून पैसे परत मिळावे, अशी मागणी शाखाप्रमुखाकडे केली तसेच क्रेडिट कार्ड तात्काळ बंद करण्याबाबत पत्र दिले.
ॲपचा वापर करून वळविली रक्कम
या कार्डवरून ११ नोव्हेंबर २०२० रोजी वन मोबीविक सिस्टीम पी ३५६ द्वारे आधी ४२ हजार व नंतर ४० हजार असे एकूण ८२ हजार रुपये काढण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. तर ४,९०९ रुपये व्याज लागल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. मात्र या क्रेडिट कार्डचा वापरच केलेला नसताना या ग्राहकाचे ८६ हजार रुपये मात्र कपात झाले आहे.