बीड : येथील जिल्हा रुग्णालयात सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. ताे दूर करण्यासाठी गणेश मंडळांसह भक्तांनी पुढे येण्याची गरज आहे. या वर्षीचा उत्सव रक्तदान करून साजरा करण्याची गरज आहे. रक्तदान केल्याने सरकारी रुग्णालयातील गरीब रुग्णांचे प्राण वाचणार असून सर्वांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
जिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांसह थॅलेसिमिया, रक्तक्षय, हेमोफिलिया, प्रसूतीनंतर होणारा रक्तस्राव अशा रुग्णांना रक्ताची अत्यंत आवश्यकता असते; परंतु मागील काही दिवसांपासून कोरोनामुळे रक्तदान करणाऱ्यांची संख्या घटली आहे. मध्यंतरी 'लोकमत'ने जिल्हाभर रक्तदान शिबीरे घेतली होती. त्यामुळे रक्तपेढीत साठा आला होता; परंतु आता पुन्हा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे आता गणेशभक्तांनीच पुढे येऊन रक्ताच्या तुटवड्याचे 'विघ्न' दूर करण्याची गरज आहे. रक्तदान शिबिरासाठी लागणारी सर्व यंत्रणा जिल्हा रुग्णालय प्रशासन उपलब्ध करून देईल, असा विश्वास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी व्यक्त केला आहे.
--
जिल्हा शासकीय रक्तपेढीत सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा आहे. रुग्णसंख्या पाहता रक्त कमी आहे. त्यामुळे सर्वांनीच पुढे येऊन रक्तदान करावे. जी मदत लागेल, ती करायला आम्ही तयार आहोत.-
- डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड
--
असा होता शनिवारी रक्तसाठा
ए पॉझिटिव्ह १३
बी पॉझिटिव्ह १३
ओ पॉझिटिव्ह ०
एबी पॉझिटिव्ह ८
-
रोज आवश्यक रक्तपिशव्या - ४० ते ५०