कडा : गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हाभरात चोऱ्या, घरफोड्या, दरोडे, जबरी चोऱ्या या माध्यमातून नागरिकांवर दहशत बसवून रात्री नव्हे तर दिवसाढवळ्या चोऱ्या करणाऱ्या आष्टी तालुक्यातील एका टोळीने मोठी दहशत निर्माण केली आहे. यातील काही आरोपीना पकडण्यात गुन्हे शाखेला यश मिळाले असले तरी त्याची पाळेमुळे शोधण्याचे आव्हान सध्या स्थानिक गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांसमोर असल्याचे दिसून येत आहे.
आष्टी उपविभागीय पोलीस कार्यालयाअंतर्गत आष्टी, पाटोदा, शिरूर, अंभोरा, अंमळनेर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावांत रात्री-अपरात्री आणि दिवसाढवळ्या जबरी चोऱ्या करून एका टोळीने नागरिकांत दहशत निर्माण केली होती. आष्टी तालुक्यात त्या टोळीचा मोठा दबदबा असून इथूनच सगळे नियोजन केले जात आहे. स्थानिक पोलिसांना दरोडा, जबरी चोरी, घरफोडीमध्ये कार्यरत असलेल्या यादीत या टोळीतील अनेकांची नावे असूनदेखील त्याचा थांगपत्ता लागत नाही.
नुकतेच स्थानिक गुन्हे शाखेने या टोळीतील काही जणांना जेरबंद केले असले तरी या टोळीची पाळेमुळे शोधण्याचे आव्हान आता स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस यांच्यापुढे असल्याचे दिसून येत आहे.
दरोडा, घरफोडी, जबरी चोरीमध्ये मुख्य सूत्रधारही त्या टोळीचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.
इतर जिल्ह्यातही याच टोळीचे सदस्य कार्यरत आहेत.
आष्टी तालुक्यातील या टोळीत जवळपास एकाच घरातील मोठ्या संख्येने लोक आहेत. टोळीतील लहान मोठा भाऊ पोलिसांच्या ताब्यात गेला की त्याला सोडवण्यासाठी हे लोक नागरिकांच्या जिवावर उठून दरोडा, घरफोडी, चोरी करून अशाप्रकारे पैसे आणतात. एवढेच नाही तर जिल्ह्याबाहेरदेखील या टोळीतील सदस्य कार्यरत आहेत. अनेक सदस्य तुरुंगामध्ये आहेत. तरी देखील या टोळीची दहशत कमी होताना दिसत नाही. आठवड्यातून कुठे ना कुठे चोरीचे प्रकार समोर येत आहेत.