बीड : रात्री घरात घुसून लाेकांना चाकू व इतर हत्याचांराचा धाक दाखवून तसेच शांत बसले नाहीत तर मारहाण करून दरोडा टाकणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. आतापर्यंत चौघांच्या मुसक्या आवळल्या असून दोघे फरार झाले आहेत. त्यांच्याकडून बीड ग्रामीण, नेकनूर आणि शिरूर पोलिस ठाण्यातील दरोड्याचे गुन्हे उघड झाले आहेत. ही कारवाई गुरूवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली. दुपारी त्यांना संबंधित पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
मिलींद विजय पवार (वय २४ रा.रूटी ता.आष्टी ह.मु.चिंचोडी पाटील, अहमदनगर), श्रीकांत उर्फ शिरक्या बाबा काळे (वय ४१), बाबा उर्फ बाब्या आत्माराम काळे (वय ३३) आणि राजेंद्र तात्याराम शिंदे (वय ५४ तिघेही रा.कोठाळवाडी इटकूर ता.कळंब जि.धाराशिव) अशी पकडलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. या सर्वांना संबंधित पोलिस ठाण्यात हजर केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि सतिष वाघ, पोउपनि श्रीराम खटावकर, भगतसिंग दुल्लत, प्रसाद कदम, बाळकृष्ण जायभाये, मारूती कांबळे, रामदास तांदळे, सोमनाथ गायकवाड, विकास वाघमारे, जफर पठाण, अर्जून यादव, सचिन आंधळे, चालक कदम आदींनी केली.