बीड : मांजरसुंबा रोडवर संभाजी चौकाजवळ बायपासच्या बाजूला काही दरोडेखोर वाहनांना अडवून लूटमारीच्या उद्देशाने दबा धरून बसल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. सदर माहितीवरून एलसीबीच्या पथकाने तत्काळ कारवाई करीत पाठलाग करून सहा दरोडेखोरांना ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बुधवारी (दि. १६) रात्री अन्य एका गुन्ह्यातील आरोपींचा पाली परिसरात शोध घेत होते. या दरम्यान त्यांना बीड-मांजरसुबा महामार्गावरील बीड बायपास छत्रपती संभाजीराजे चौक परिसरातील रस्त्याच्या बाजूला बायपासजवळ काही चोरटे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना लुटण्याच्या उद्देशाने दबा धरून बसले असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर एलसीबीच्या पथकाने रात्री साडेआठच्या सुमारास तातडीने संभाजी चौकाकडे धाव घेतली शोध सुरू केला. यावेळी पोलिसांना पाहून पळून जाणाऱ्या रवी लक्ष्मण जाधव, भीमा शामराव जाधव, अशोक बबन जाधव, विकास भरत गायकवाड, राजेंद्र सूर्यभान गायकवाड (सर्व रा. गांधीनगर, बीड) व दीपक बाबासाहेब ढवळे (रा. सौंदाना, ता. बीड) या वाटमारी करणाऱ्यांना ताब्यात घेतले.
यावेळी पोलिसांनी या सहा चोरट्यांकडून दोन तलवारी, लोखंडी रॉड, सुती दोरी, मिरचीपूड, मोबाईल, रोख रक्कम आणि कार असा एकूण तीन लाख ३६ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक भगतसिंग दुलत यांच्या फिर्यादीवरून सर्व आरोपींवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर. राजा, अप्पर अधीक्षक सुनील लांजेवार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भगतसिंग दुलत, पोलीस कर्मचारी शेख, शिंदे, बागवान, वंजारे, खेडकर, वाघ यांनी केली.
२१ जूनपर्यंत पोलीस कोठडी
पोलिसांनी सर्व आरोपींना गुरुवारी (दि. १७) न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्या सर्वांना २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीदरम्यान अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस प्रशासनाकडून वर्तविली जात आहे.