बीड : पिस्तूलचा धाक दाखवून कापसाचे ट्रक लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला गजाआड करण्यात बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. ही कारवाई शुक्रवारी मध्यरात्री परळी तालुक्यातील सिरसाळा येथे करण्यात आली. या टोळीवर परभणी व बीड जिल्ह्यात गुन्हे दाखल असल्याचे समोर येत आहे.
अमृत भाऊसाहेब देशमुख (३६ कन्नापूर ता.धारूर), राजेश ज्ञानोबा बडे (४० रा.सिरसाळा), भगवान उर्फ सोनू शेषराव मुंडे (३० रा.डाबी ता.परळी), आकाश भिमराव गायकवाड (३० रा.सिरसाळा), दीपक भिमराव केकान (२४ रा.दिंद्रुड चाटगाव सांगळेवस्ती ता.धारूर) अशी पकडलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. २३ डिसेंबर रोजी शेख इलियास शेख मुसा व बिभीषण शंकर फसके हे दोघे कापसाचा भरलेला ट्रक घेऊन जात होते. रात्रीच्या सुमारास धारूर घाटात त्यांना या दरोडेखोरांनी गाठले. लिफ्टच्या बहाण्याने दोघे ट्रकमध्ये बसले. नंतर त्यांना दारू पाजून बेशुद्ध केले आणि त्यांच्या ताब्यातील ट्रक घेऊन जिनींगवर गेले. येथे कापूस विक्री केल्यानंतर ट्रक जालना जिल्ह्यात नेऊन सोडला.
याप्रकरणी धारूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तात्काळ तपास करून अवघ्या दोन दिवसांत पाचही दरोडेखोरांना गजाआड केले. त्यांच्याकडून पिस्तूल, जीप असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. कापूस विक्री केलेले पैसेही वसुल करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले. या सर्व आरोपींना धारूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, परी.उपअधीक्षक रोशन पंडित, पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनखाली एलसीबीचे सपोनि दिलीप तेजनकर, मनोज केदारे, भास्कर केंद्रे, मुंबाजा कुंवारे, दिलीप गलधर, बालाजी दराडे, शेख सलीम, नरेंद्र बांगर, सतीष कातखडे, विष्णू चव्हाण, संतोष म्हेत्रे, शेख आसेफ, अशोक मिसाळ, भागवत बिक्कड, मुकूंद सुस्कर, सुग्रीव रूपनर आदींनी केली.
आणखी गुन्हे उघड होतील कापसाचा ट्रक लुटणारे पाच जणांना अटक केली आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून सर्व आरोपी धारूर पोलीस ठाण्यात आहेत. आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने आमचा तपास सुरू आहे.- जी. श्रीधर, पोलीस अधीक्षक, बीड