बीड : दरोड्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. या टोळीकडून एक कार, मिरची पावडरच्या पुड्या, लोखंडी गज, कोयता, वायर दोरी, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. टोळीतील चार जण पुणे येथील असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान चार दिवसात दरोडेखोरांची दुसरी टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे.
रविवारी पहाटेच्या सुमारास दरोडा प्रतिबंधक पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, सहकारी पोलीस कर्मचारी अभिमन्यू औताडे, बी. डी. बंड, अशोक दुबाले, चालक अंकुश दुधाळ हे गस्त घालत होते. त्यादरम्यान एका कारमधून काही संशयित आल्याची माहिती मिळाल्यानंतर बसस्थानकात कर्तव्यावर असलेले धारुर पोलीस ठाण्यातील कर्मचारी शेख खमर पाशा शेख हाजीउद्दीन तसेच मुकुंद तांदळे यांना सोबत घेत तांदळवाडी रोडवर जिनिंगच्या परिसरात शोध सुरु केला.
कारचा पाठलागपोलिसांचे वाहन पाहून कारचालकाने कार सुरु करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हात दाखवून थांबण्याचा इशारा केला, मात्र कार थांबली नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि सदर कारचा पाठलाग सुरु केला. अखेर धारुरच्या शिवाजी चौकात जनतेच्या मदतीने रस्ता अडवून कार थांबविण्यात आली, तोच कारमधील संशयितांनी दरवाजे उघडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरोडा प्रतिबंधक पथकातील कर्मचाऱ्याच्या मदतीने पाठलाग करुन कारमधील सात जणांना जेरबंद करण्यात आले.
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, केजचे डीवायएसपी श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या नेतृत्वाखाली दरोडा प्रतिबंधक पथक आणि धारुर पोलीस कर्मचाºयांनी ही कारवाई केली.
या टोळीकडून एमएच ४०- एस ३०३२ क्रमांकाची कार, मिरची पावडर, लोखंडी गज, कोयता, वायर दोरी, मोबाईल असा २ लाख २५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शेख खमरपाशा शेख हाजीउद्दीन यांच्या फिर्यादीवरुन दरोड्याचा कट रचून प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास धारुर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मोरे व कर्मचारी करीत आहेत.
आरोपी पुणे, नागपूर, धारूर, दिंद्रूडचेपकडलेले गुन्हेगार पुणे, नागपूर, धारूर, दिंद्रूड, भागातील असल्याचे पोलिसांच्या चौकशीत पुढे आले. या टोळीतील आकाश भागवत उजगरे (वय २३ रा.दिंद्रूड), संजीवन नवनाथ सांगळे (वय २३, रा.भाटगाव, ता.धारूर), अविनाश तानाजी मेंगडे (वय २७, रा.कोथरुड, पुणे), अनुप रामराव साळवे (वय २१, रा.नागपूर, पारडी,), प्रवीण बळीराम गवळी (वय २०, रा.केकर जवळा), मयूर रामभाऊ पंधारे (वय २०, रा.पारडी, नागपूर),भूपेंद्र चुन्नीलाल पारधी (वय ४० रा.पारडी, नागपूर) यांना अटक करण्यात आली आहे.