बीड : शौचालय, पाणी पिणे, जेवणासाठी हॉटेलवर थांबलेली वाहने अडवून प्रवास्यांना चाकुचा धाक दाखवित लुटणारी टोळी शुक्रवारी सायंकाळी गजाआड करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली. या टोळीत चौघे असून त्यांना गेवराई पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या टोळीने बीड-गेवराई, गेवराई-माजलगाव रस्त्यावर धुडगूस घातला होता. अखेर या टोळीच्या मुसक्या आवळण्यात बीड पोलिसांना यश आले आहे.
रामभाऊ भगवान गव्हाणे (२०), अंबादास अंकुश गव्हाणे (२१), संतोष हनुमंत धनगर (२२), ज्ञानेश्वर श्रावण माळी (२३ सर्व रा.बेलगाव ता.गेवराई) असे लुटारू टोळीतील आरोपींची नावे आहेत. या टोळीतील आणखी एक आरोपी फरार आहे. १२ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास लघुशंकेसाठी रस्त्यात कार थांबविण्यात आली. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या या टोळीने त्यांना चाकुचा धाक दाखविला. त्यांना मारण्याची धमकी दिली. त्यांच्याजवळील दोन मोबाईल व रोख ४२ हजार रूपये घेऊन ही टोळी पसार झाली. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात नोंदही झाली. अशाच दोन-चार घटना या परिसरात घडल्याने वाहनचालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. गेवराई पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने याबाबत माहिती घेण्यास सुरूवात केली. यावेळी त्यांना बेलगाव येथील आरोपी असल्याचे समजले.
पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी तात्काळ सापळा लावण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिलीप तेजनकर यांची टिम बेलगाव वस्तीवर पोहचली. रामभाऊ व अंबादासला त्यांच्या घरातच बेड्या ठोकल्या. या दोघांना अटक झाल्याची माहिती संतोष आणि ज्ञानेश्वरला मिळाली. ते दोघेही उमापूर मार्गे नगरच्या दिशेने पळून जात होते. याचवेळी त्यांचा पाठलाग करून त्यांना दुचाकीसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक चोरीची दुचाकी व मोबाईल जप्त केले असून इतर मुद्देमाल वसुल करणे सुरू असल्याचे पाळवदे यांनी सांगितले. फरार आरोपीलाही लवकरच बेड्या ठोकू, असेही पाळवदे म्हणाले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि घनश्याम पाळवदे, सपोनि दिलीप तेजनकर, तुळशीराम जगताप, नरेंद्र बांगर, प्रसाद कदम, मुन्ना वाघ, विष्णू चव्हाण, मोहन क्षीरसागर, सलीम शेख, संतोष म्हेत्रे, अनिल डोंगरे, आसेफ शेख, विकी सुरवसे आदींनी केली.
संतोषच टोळीचा म्होरक्याएकाच गावातील असल्याने सर्वांची चांगली ओळख झाली. सर्वच व्यायामासाठी सोबत जात होते. मैत्री घट्ट झाल्याने पार्टी, शौक वाढले. परंतु कामधंदा नसल्याने पैसे येत नव्हते. मग संतोषनेच या सर्वांचे कान भरले आणि लुटण्याची कल्पना आखली. त्याच्या सांगण्यावरूनच त्यांनी माजलगाव व अन्य एका ठिकाणाहून दुचाकींची चोरी केली. आणि त्याच दुचाकींवरून त्यांनी अनेकांना चाकुचा धाक दाखवून लुटले. या टोळीचा संतोषच म्होरक्या होता. त्याच्यावर २०१५ साली चकलंबा पोलीस ठाण्यात दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल असल्याचेही पोलीस सूत्रांनी सांगितले.