बीड : शहरातील सहयोगनगर भागात स्टेडियमकडे जाणाऱ्या रस्त्यावर कुंडीभोवती कचरा मोठ्या प्रमाणात पसरला आहे. लगतच जालनारोड, सुभाषरोड असल्याने या रस्त्यावर पादचाऱ्यांची वर्दळ असते. दुर्गंधीमुळे जाणाऱ्या येणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. नगरपालिकेने तातडीने सफाई करण्याची मागणी होत आहे.
पशुपालकांचा हेलपाटा
चौसाळा : येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार घेण्यासाठी अनेक पशुपालक आपल्या जनावरांना घेऊन येतात, मात्र त्याठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने उपचाराविनाच परतावे लागत आहे. पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्याची मागणी आहे.
खंडित वीजपुरवठ्याने ग्रामस्थ वैतागले
मांजरसुंबा : बीड तालुक्यातील मांजरसुंबा आणि परिसरात वेळी-अवेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. शेतकऱ्यांना पाणी असूनही पिकांना देता येत नसल्याने पिके वाळत आहेत. अनेक ठिकाणी तारा खाली आल्या असून, जीर्ण तारांमुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
तारा लोंबकळल्या
वडवणी : तालुका आणि परिसरातील गावांमध्ये अनेक ठिकाणी विद्युततारा लोंबकळत आहेत. त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. वीजतारा ताणण्याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. दुरुस्तीची कामे रखडलेली आहेत. यामुळे संताप व्यक्त होत आहे.
रुग्णालयाभोवती घाण
गेवराई : शहरातील उपजिल्हा रुग्णालय परिसराभोवती घाण साचली आहे. यामुळे दुर्गंधी सुटली असून, रुग्ण व नातेवाइकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. परिसरात कचरा टाकू नये, असे वारंवार सांगण्यात येऊनही त्याकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात येत आहे.
दारू विक्री बंद करा
शिरूर कासार : तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध दारू बनविली जाते. यामुळे अनुचित प्रकार घडत आहेत. अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी दारूबंदीची मागणी केली आहे. पोलिसांनीदेखील याकडे लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.