माजलगाव ( बीड ): स्वच्छ शहर, सुंदर शहराचा नारा देणारे पदाधिकारी भंगारमध्ये पडलेल्या कचराकुंडी गाडीच्या नावावर वर्षाकाठी लाखोची बिले उचलत असल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात मात्र पालिकेकडून शहरातील कचरा बायपास रस्त्याच्या कडेला टाकण्यात येत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील ओला, सुका कचरा उचलून तो केसापुरी येथील घनकचरा युनिटमध्ये टाकण्यासाठी काही वर्षापूर्वी मोठा टेम्पो नगर पालिकेने खरेदी केला होता. शहरात विविध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या कचरा कुंड्या थेट उचलून त्या घनकचरा युनिटमध्ये टाकण्याचे काम या गाडीने करण्यात येत होते. परंतु मागील तीन- चार वर्षांपासून कचराकुंडी घेऊन जाणारी गाडी नादुरुस्त अवस्थेत बायपासला भंगारमध्ये पडलेली आहे. जुलै २०१७ मध्ये औरंगाबादच्या आयुक्त कार्यालयातील एक पथक माजलगाव शहरातील स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी तत्कालीन मुख्याधिकारी बी. सी. गावित यांनी शहरातील कचरा कचराकुंडी वाहून नेणार्या गाडीने उचलून तो केसापुरी येथील घनकचरा युनिटमध्ये टाकण्यात येत असल्याचा अहवाल २७ जुलै २०१७ रोजी आयुक्त कार्यालयाला देण्यात आला होता.
पालिका प्रशासनाने चुकीचा अहवाल देण्यामागचे गुपित काय, असा प्रश्न निर्माण होत असून, यातून पालिका पदाधिकारी बंद पडलेल्या गाडीच्या नावावर लाखो रु पयांचे बिल उचलून स्वत:चे उखळ पांढरे करून घेत असल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोप नगरसेवक शेख मंजूर यांनी केला आहे. शहरातील कचर्याची सद्य परिस्थती पाहता शहरातील कचर्याची विल्हेवाट केसापुरी येथील घनकचरा युनिटमध्ये न लावता तो चक्क शहराच्या बायपास रोडच्या बाजूला, सिंदफणा नदीपात्राच्या कडेला टाकण्यात येत आहे.
रस्त्याच्या बाजूलाच कचरा टाकण्यात येत असल्याने येणार्या जाणार्या नागरिकांना दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत असून नदीपात्रातील पाणीही दूषित होत आहे. पालिका कर्मचारी टाकलेला कचरा जळून देत असल्याने मोठ्या प्रमाणात दूषित वायू निर्माण होत असून नागरिकांना श्वसनाचे आजार जडत असल्याच्या तक्रारी नागरिकांतून येत आहेत. वास्तविक शहरात सर्वत्र कचर्यामुळे दुर्गंधी पसरली असून स्वच्छ शहर सुंदर शहराचा नारा हवेतच विरल्याचे सत्य परिस्थिती दिसून येत आहे.
अहवालाची कल्पना नाही आयुक्तांना अहवाल दिल्याची मला काहीही माहीत नाही. शिवाय पालिकेचे कर्मचारी शहरातील कचरा कुठे टाकतात याची माहिती घेऊन तो रस्त्याच्या कडेला टाकला जात असेल तर यापुढे तो घनकचरा युनिटला टाकण्यात येईल. - लक्ष्मण राठोड, प्रभारी मुख्याधिकारी