दुचाकी चोर सक्रिय
बीड : शहरातील प्रमुख भागातील दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. गाडी चोरीस गेल्यानंतर तक्रारी दाखल होतात. एफआयआर दाखल होतो. पोलिसांना चोरांचा माग लागत नसल्याचे चित्र आहे. या चोरींना आळा घालण्याची मागणी आहे.
गुटखा, दारू विक्री
माजलगाव : टाकरवण परिसरात सध्या अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू आहे. गुटखा बंदी असूनही गावात गुटखा विक्री सर्रास सुरू आहे. तसेच अवैध दारू विक्रीही बोकाळली आहे. दारूच्या व्यसनाने अनेकांचे संसारात कलह वाढत चालले आहेत.
सिलिंडर चढ्या भावाने
बीड : घरगुती तथा व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा अंबाजोगाई तालुक्यात काही लोकांनी गोरखधंदा सुरू केला आहे. अंबाजोगाई शहरातून स्वत:च्या नावावर गॅस घेऊन त्या सिलिंडरची विक्री चढ्या भावाने व्यावसायिकांना केली जाते.
इंटरनेट विस्कळीत
बीड : मागील काही दिवसांपासून बीड शहरात बीएसएनएलची इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. इंटरनेटला स्पीड मिळत नसल्याने ग्राहक वैतागले आहेत. तक्रारी केल्या; परंतु याची दखल घेतली जात नसल्याचे दिसते.