माजलगाव : येथील नगर परिषदेस केसापुरी येथे घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी जागा देण्यात आली असताना तेथे कचऱ्यावर प्रक्रिया न करता तो पेटवून देण्यात येत असल्याने त्याची दुर्गंधी येत आहे. यामुळे प्रदूषणाच्या त्रासामुळे वैतागलेल्या संतप्त ग्रामस्थांनी रविवारी आंदोलन करून नगर परिषदेच्या सात कचरा गाड्या परत पाठवल्या. तसेच तेथे सुरू असलेले बांधकामही रोखले.
माजलगाव शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगर परिषदेस शहरापासून जवळच असलेल्या केसापुरी येथे घनकचरा व्यवस्थापन युनिटसाठी जागा देण्यात आली होती. मात्र, तेथे जागेचा वापर झाला नाही व युनिटही सुरू केले नाही. नगर परिषदेने शहरात कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी ठेकेदारास काम दिले आहे. मात्र, ठेकेदार त्याच्या वाहनात ओला व सुका कचरा अशी विभागणी न करता सरसकट कचरा गोळा करून टेम्पोत टाकून नेतो व तेथे कचरा पेटवून दिला जातो. त्यामुळे प्रदूषण व दुर्गंधी होऊन त्याचा आरोग्यावर परिणाम होत असल्याने केसापुरी गावकऱ्यांनी यापूर्वी नगर परिषदेस निवेदने दिली होती.
परंतु कार्यवाही होत नसल्याने अखेर रविवारी सकाळी विलास साळवे यांच्या नेतृत्त्वाखाली शरद घनघाव, बाळू राठोड, ॲड. रोहित साबळे, सगीर देशमुख, जायकोबा राठोड, सचिन लाडे, धीरज सोळंके, गोपाळ दौंडे, कैलास शिंगाडे, विठ्ठल साबळे आदींसह ग्रामस्थांनी नगर परिषदेच्या ७ कचरा गाड्या अडवून त्या परत पाठवल्या. चालकांनी या गाड्या वळवून बायपास व सिंदफना नदीकाठाकडे हा कचरा नेवून टाकला. त्यामुळे शहरवासियांना दुर्गंधीचा सामना करावा लागणार आहे.
===Photopath===
250421\purusttam karva_img-20210425-wa0036_14.jpg