माजलगाव : आंध्र प्रदेशातील व्यापाऱ्याने ग्रेनाइट कमी भावात देण्याचे आमिष दाखवून, माजलगावच्या व्यापाऱ्याकडून सव्वादोन लाख रुपये जमा करून घेतले. त्यानंतर, मोबाइल बंद करून संपर्क तोडून टाकला. या प्रकरणी आंध्र प्रदेशातील व्यापाऱ्यावर माजलगाव ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पुरुषोत्तम राधेशाम लड्डा असे त्या फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. पुरुषोत्तम लड्डा यांचे माजलगाव शहरात ग्रेनाइट विक्रीचे दुकान आहे. त्यांच्या गुलबर्गा येथील मोठ्या भावाने आंध्र प्रदेशातील येलुरू येथील अंजनिया ग्रेनाइटचा डीलर विजय बाबू हा कमी भावात ग्रेनाइट देत असल्याचे सांगितले. त्यावरून पुरुषोत्तम यांनी विजय बाबूशी संपर्क साधला. सोशल मीडियाद्वारे फोटो पाहून त्यांच्यात सौदा ठरला. ६ हजार फूट ग्रेनाइटची ऑर्डर देत, पुरुषोत्तम यांनी १७ फेब्रुवारी विजयबाबूच्या बँक खात्यावर २ लाख २५ हजार रुपये जमा केले. विजय बाबूने ट्रकमध्ये (केए ५६-३४३९) ग्रेनाइट भरत असल्याचे फोटो पाठवून गाडी १९ फेब्रुवारीला माजलगावला येईल, असे सांगितले, परंतु त्या तारखेला गाडी न आल्याने पुरुषोत्तम यांनी विजयबाबूला वारंवार कॉल केले असता, त्याने मोबाइल बंद करून ठेवला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे पुरुषोत्तम लड्डा यांच्या लक्षात आले आणि त्यांनी माजलगाव ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून विजय बाबूच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.