गेवराई (बीड ) : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उन्हाळ्यात आठवण येते ती हातपंप व विहिरीची; पण प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहारांसह अनेक गावातील हातपंप नादुरूस्त अवस्थेत दिसून येतात. दरवर्षी नवीन हातपंपावर मात्र नित्यनेमाने पैसा खर्च केला जातो. या कारभारामुळे तालुक्यातील हातपंप आणि विहिरी कुचकामी ठरत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
जिल्हा व तालुका प्रशासनाकडून दरवर्षी उन्हाळ्यापूर्वी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना केल्या जातात. यात नवीन हातपंप करणे, विहिरींचे अधिग्रहण करणे, विहिरींमध्ये बोअर करणे इ. अनेक उपायांचा समावेश असतो. मात्र, हे करीत असताना जुन्या हातपंपांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे प्रकर्षाने जाणवते. परिणामी अनेक ठिकाणचे हातपंप बंद अवस्थेत दिसतात.
गेवराई तालुक्यातील गढी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, जय भवानी नगर, नवोदय विद्यालय येथील काही हातपंप गत अनेक दिवसांपासून बंद आहेत. अन्य ठिकाणचे हातपंपही अनेक दिवसांपासून बंद आहेत. भूगर्भातील पाणी पातळी खालावल्यामुळे हातपंप कुचकामी ठरू लागले आहेत. पंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हे हातपंप दुरूस्त करणे गरजेचे झाले आहे. गढीतील हातपंप तक्रार करूनही नादुरूस्त अवस्थेतच आहेत. गढी तथा गेवराई तालुक्यातील अनेक गावांतील हातपंप मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. परिणामी महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हातपंप बंद असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या; पण संबधित यंत्रणा दुरूस्त करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. याबाबत गेवराई पंचायत समिती येथील गट विकास अधिकारी एन.पी. राजगुरु यांना माहिती विचारण्यासाठी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
हातपंप बनले शोभेची वस्तूतालुक्यातील अनेक गावांत हातपंप आहेत; पण कुठे पाणी खोल गेले तर कुठे दांड्यांनी माना टाकल्या आहेत. परिणामी हे हातपंप शोभेची वस्तू ठरत असल्याचे दिसून येत आहे. उपयोगाचे नसल्याने अनेक हातपंप माती मुरूमामध्ये दबलेल्या स्थितीत आढळून येतात. त्या हातपंपाची दुरूस्ती करून ते उपयोगात आणण्याचे प्रयत्न कुठेही होताना दिसत नाही. दरवर्षी नवीन हातपंपांची मागणी वाढताना दिसून येत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. तालुक्यातील हातपंपाची दुरूस्ती करण्याबाबत प्रशासन कायम उदासीन भूमिका घेत आहे. काही हातपंपांची चेन तुटली, तर कुठे पाणी खोल गेल्याने हातपंप बंद आहे.यामुळे महिलांना शेतशिवारातून पाणी आणावे लागते. ग्रामसेवकांनी तक्रार करुनही दुरूस्तीचे वाहन आले नाही.