अंबाजोगाई : दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकजण बेरोजगार झाले आहेत. तर अनेकजण विविध कारणाने आर्थिक संकटात आहेत. अशा स्थितीत उदरनिर्वाह भागविणे अवघड असताना सर्वच बाबतीत महागाई वाढत चालल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा
अंबाजोगाई : पेरणीपूर्वी शेतकऱ्यांच्या विविध समस्या मार्गी लावणे गरजेचे आहे. खत कारखान्यांना दिली जाणारी सबसिडी शेतकऱ्यांना द्यावी. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून द्यावे. रखडलेले विविध अनुदान व विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. रासायनिक खतांच्या किमती कमी कराव्यात. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिरीष मुखडे यांनी केली आहे.
कोरोनामुळे दात्रत्वाचा झरा आटतोय
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात असणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था या समाजातील दानशूर व संवेदनशील व्यक्तीच्या मदतीवर चालतात. मात्र गेल्या वर्षभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. परिणामी अनेकांचा संपर्क दुरावला आहे.तर मदत करणारे दाते ही आर्थिक संकटात सापडल्याने दात्रत्वाचा झरा आटू लागल्याने अनेक सामाजिक संस्था आर्थिक संकटात सापडल्या आहेत.
रस्त्यावर स्टंटबाजी
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी असतानाही अनेक युवक रात्रीच्या वेळी मोटारसायकल वर टिबल सीट बसून विविध कसरती करणे, क्रिकेट खेळणे, वाहनांची स्पर्धा लावणे अशी स्टंटबाजी करत आहेत. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे. अशी मागणी होत आहे.
लॉकडाऊनमुळे स्थलांतर थांबले
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील बहुतांश लोक उदरनिर्वाहासाठी मुंबई, पुणे,व विविध महानगरात रोजगारासाठी असतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने अनेक व्यवसाय बंद आहेत. गावातही हाताला काम नाही. सर्व बंद असल्याने महानगराकडे ही जाता येईना. यामुळे अनेकांचे स्थलांतर थांबले आहे.