लोकमत न्यूज नेटवर्कबीड : महिला व मुलींच्या मनात आजही छेडछाड विरोधी पथकाने घर केलेले नाही. त्यामुळेच मुली तक्रार देण्यासाठी पुढे न येता आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. अशीच घटना गेवराई तालुक्यातील तळवट बोरगाव येथे घडली. दोन रोडरोमिओंनी अश्लिल भाषेत बोलून कॉल रेकॉर्ड करीत क्लीप सोशल मिडीयावर व्हायरल केली. बदनामीच्या भीतीने तिने ‘मला मेल्याशिवाय पर्याय नाही’ असे म्हणत आजोबासाठी आणलेल्या दमा आजाराच्या तब्बल ३० गोळ्या गिळल्या. अत्यावस्थ झालेली विद्यार्थिनी सध्या जिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
तळवट बोरगाव येथील सुनीता (नाव बदलेले) ही गढी येथील महाविद्यालयात बी.ए.प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. गावाकडून रोज बसने ये-जा करते. आई-वडील औरंगाबादला मजुरी करतात. सुनीताचा सांभाळ आजोबाच करतात. मागील दोन महिन्यांपासून गावातीलच सचिन श्रीराम गाडे, दीपक आबासाहेब गाडे या दोन रोमिओंनी तिची छेड काढायला सुरूवात केली. तिने सुरूवातीला समजावले. परंतु त्यांनी ऐकले नाही. या रोमिओंनी तिचा मोबाईल क्रमांक मिळवित तिला संपर्क करायला सुरूवात केली. परंतु तिने दाद दिली नाही.
अशातच संतापलेल्या सचिन व दीपक या रोमिओंनी तिला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच हा कॉल रेकॉर्ड करून गावातीलच सोशल मीडियाच्याच एका ग्रुपवर व्हायरल केला. ही माहिती सुनीताला समजली. आता आपली गावात बदनामी होईल. आपल्याला जगून काय फायदा. मला मेल्याशिवाय पर्याय नाही, असे म्हणत सुनीताने आजोबासाठी आणलेल्या दम्याच्या तब्बल ३० गोळ्या एकदाच गिळल्या. यामुळे ती अत्यवस्थ झाली. हा प्रकार लक्षात येताच आजोबांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या तिची प्रकृती गंभीर असून ती मृत्यूशी झुंज देत आहे.
सचिन व दीपक यांच्या त्रासाला कंटाळूनच आपण गोळ्या गिळल्याचा जबाब सुनीताने जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत दिला असल्याचे सहायक फौजदार बी.ए.गांधले यांनी सांगितले. अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, असेही गांधले म्हणाले.
पथके उरलीत नावालाचबीड शहरासह प्रत्येक तालुक्यात छेडछाडीला आळा घालण्यासाठी पथके नियुक्त केलेली आहेत. या पथकांचा दोन वर्षांपूर्वी वचक होता. दामिनी, चिडीमार पथक असे नाव कानावर पडताच रोमिओ धूम ठोकत होते. परंतु आता हे पथके केवळ नावालाच उरली आहेत. या पथकांचा कसलाच दबदबा राहिला नसल्याचे वारंवार जाणवत आहे.४केवळ कार्यक्रमात हजेरी लावणे आणि वरिष्ठांसमोर वावरणे, एवढेच काम सध्या पथकाकडून केले जात आहे. वास्तविक पाहता ग्राऊंड लेव्हल व फिल्ड वर्क मात्र कमीच असल्याने संताप व्यक्त होत आहे. महिला व मुलींशी संवाद कमी झाल्यानेच पीडितांना संपर्क साधता येत नाही. तसेच त्यांचा आत्मविश्वास खचत आहे. त्यामुळे पथकांनी पुन्हा एकदा जोमाने काम करण्याची गरज आहे.