थेरला-घाटेवाडीच्या सरहद्दीवर घाटेवाडी पाझर तलाव लघुपाटबंधारे विभागामार्फत पूर्ण करण्यात आला आहे. मात्र, या तलावात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना अद्याप मावेजा मिळालेला नाही. २०१६ साली तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हा तलाव फुटला. तेव्हापासून या तलावात पाणीसाठा होत नाही. त्यामुळे थेरला व घाटेवाडी येथील शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. लघुपाटबंधारे विभागाने फुटलेल्या तलावाची दुरुस्ती करण्यासाठी ३० लाख रुपये मंजूर केले असून, काम सुरू करण्यासाठी निविदा ,कार्यारंभ आदेश वगैरे सोपस्कार पूर्ण झाले आहेत. मात्र, या तलावात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी जमिनीचा मोबदला दिल्याशिवाय हे दुरुस्तीचे काम सुरू करू नये, असा पवित्रा घेतला आहे. पाटोदा लघु पाटबंधारे उपविभागाचे उपअभियंता ए. के. पठाण यांची या शेतकऱ्यांनी भेट घेऊन लेखी मागणीही दिली आहे. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांनाही दिले आहे; मात्र या निवेदनाची कोणतीही दखल न घेता संबंधितांनी दुरुस्ती कामाचा प्रारंभ केला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी आता पालकमंत्री यांच्याकडे धाव घेऊन जमिनीचा मावेजा द्या, नंतरच काम सुरू करा, अशी मागणी केली आहे.
जमिनीचा मावेजा मिळवून द्यावा; थेरला येथील शेतकऱ्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 4:32 AM