बीड : नैराश्येच्या भूमिकेतून बाहेर पडा. संघटना हाच राजकारणाचा खरा पाया असून पक्षाचा विचार आणि नेतृत्व सामान्य जनतेपर्यंत आपण घेऊन गेलो तर वर्तमान अपयशाचं रूपांतर पुन्हा यशात होऊ शकते. हा जिल्हा पुरोगामी विचारांचा आहे. तरीही आपण पुन्हा दुसऱ्यांदा खासदार झालो. ते केवळ जनता आणि कार्यकर्त्यांच्या बळावर.आता संघटनात्मक कार्यबांधणीला वेळ द्या.यात कुणी हालगर्जीपणा करू नका असे आवाहन खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी केले.बीड जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर भाजपची संघटनात्मक बैठक शनिवारी पार पडली. तब्बल एक तास संघटनात्मक बैठक घेताना निवडणुकीत झालेल्या पराभवापासून राजकीय जीवन आणि संघर्षावर खा. मुंडे यांनी भाष्य केले.जिल्हा भाजपात संघटनात्मक निवडणुक प्रक्रि या सुरू झाली आहे. डॉ.प्रीतम मुंडे या निवडणुक सह अधिकारी म्हणून जिल्ह्यासाठी नियुक्त आहेत. यावेळी खा. डॉ. प्रीतम मुंडे म्हणाल्या, विधानसभा निवडणुकीत पराभवाचं शल्य आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे. राजकारणात बरं आणि वाईट दोन गोष्टी असतात. पहिल्या पाच वर्षात काम करताना माझ्या मागे जिल्ह्यात पालकमंत्री, पाच आमदार आणि इतर संस्था असल्याने कुठलेच आव्हान वाटले नाही. आता मात्र रात्रीचा दिवस एक करत संघटनात्मक काम करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. संघर्ष हा आपला बाणा असून बीड जिल्हा स्व.गोपीनाथराव मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मानणारा आहे. कुठे कमी पडलो, याचा शोध घेऊ, परंतू नैराश्येच्या ूभमिकेतून सर्वांनीच बाहेर पडून संघटनात्मक कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी रमेश पोकळे यांनी निवडणुकीतील यश- अपयशाचे आत्मपरीक्षण करणार असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन सुभाष धस यांनी केले. यावेळी जिल्हाभरातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर खा. मुंडे यांनी तालुकानिहाय निवड प्रक्रि येवर स्वतंत्र बैठका घेत संघटनात्मक कामांचा आढावा घेतला.
नैराश्यातून बाहेर पडा, संघटनात्मक कामाला लागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2019 11:59 PM
आता संघटनात्मक कार्यबांधणीला वेळ द्या.यात कुणी हालगर्जीपणा करू नका असे आवाहन खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी केले.
ठळक मुद्देबीड येथे संघटनात्मक बैठक : प्रीतम मुंडे यांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आवाहन