बीड : लग्नाला कुटुंबीयांकडून विरोध होत असल्याने प्रेमीयुगुलाने पाण्याच्या टाकीवर चढून शोलेस्टाइल ठिय्या दिला होता. अखेर कुटुंबीयांनी लग्न लावून देऊ, असे लेखी दिल्यावरच ते ११ तासांनंतर खाली उतरले. शहरातील अंबिका चौक परिसरात दि. १४ रोजी रात्री हा प्रकार घडला.
शिवाजीनगर ठाणे हद्दीतील एका तरुणाचे हिंगोली येथील युवतीवर प्रेम जडले होते. दोघांना लग्न करायचे होते. मात्र, युवतीचा यापूर्वीच एक विवाह झालेला असल्याने व तिला मुले असल्याने मुलाच्या कुटुंबाकडून या विवाहाला विरोध होता. दरम्यान, महिनाभरापूर्वी याच प्रकरणातून मुलगा बेपत्ता झाला होता. रविवारी सकाळी हिंगोलीहून मुलगी बीडमध्ये आली होती. दुपारी १२ वाजता हे प्रेमीयुगुल अंबिका चौक परिसरातील अमृत अटल योजनेच्या पाण्याच्या टाकीवर चढले होते. मुलाने कुटुंबीयांना फोन करून ही माहिती देत लग्न करून द्या अन्यथा दोघे आत्महत्या करू अशी धमकी दिली होती. यानंतर दुपारपासून मुलाचे, मुलीचे कुटुंबीय, पोलीस या युगुलाची समजूत काढत होते. मात्र, ते खाली उतरण्यास राजी होत नव्हते.
अन् दोघांचेही खुलले चेहरेकुटुंबीयांनी लग्न लावून देण्याची तयारी दर्शविल्यावर रात्री ११ वाजता प्रेमीयुगुल खाली आले. त्यानंतर ते आनंदाने कुटुंबासोबत गेले. या प्रकरणात शिवाजीनगर ठाण्यात नोंद झाली नाही.