अंबाजोगाई : रस्त्याच्या रखडलेल्या कामाने व वाढत्या वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या गैरसोयींनी अंबाजोगाई व परिसरात अपघातांचे सत्र वाढले आहे. ते रोखण्यासाठी रखडलेले रस्त्याचे काम लवकर मार्गी लावा, अशी सूचना आमदार नमिता मुंदडा यांनी केली.
अंबाजोगाई येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार मुंदडा बोलत होत्या. या बैठकीला रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता विक्रम जाधव, एच. पी. एम. कंपनीचे संचालक अजय देशमुख, तांत्रिक सल्लागार रविकुमार, अभियंता निवृत्ती शिंदे, विकास देवळे यांची उपस्थिती होती. या बैठकीत आमदार मुंदडा यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचे विविध समस्यांकडे लक्ष वेधले. या बैठकीत कार्यकारी अभियंता विक्रम जाधव यांनी पिंपळा ते मांजरसुंबा या रस्त्याच्या ८२ किलोमीटरपैकी ७५ किलोमीटरचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले. या बैठकीस सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मुंदडा, वैजनाथ देशमुख, अॅड. संतोष लोमटे, अनंत आरसुडे, अमोल जाधव, रमाकांत पाटील, अभिजीत जगताप, रमाकांत उडाणशिव यांची उपस्थिती होती.
काम सुरू होईपर्यंत खड्डे खोदू नका, जिथे पुलाचे काम सुरू आहे, तिथे डांबरी रस्त्याचे वळणमार्ग करा. भाटुंबा व कळमअंबा येथे चार नळ्यांचे पूल बांधावेत. नेकनूर व केज येथील रस्त्यांचे रुंदीकरण, अंबाजोगाई शहरात लोखंडी सावरगाव ते यशवंतराव चव्हाण चौक रस्त्याच्या चौपदरीकरणास परवानगी, शहरातील भगवानबाबा चौक व यशवंतराव चव्हाण चौकाचे सुशोभिकरण करावे, रस्त्याचे काम सुरू होत नाही. तोपर्यंत रस्ते खोदू नयेत, अशा विविध सूचना उपस्थितांनी अधिकाऱ्यांना दिल्या.