शिवकन्या सिरसाट : कोविड-१९ लसीकरणाचा अंबाजोगाईत प्रारंभ
अंबाजोगाई : कोरोना काळात आशा वर्कर्सपासून प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, तालुका आरोग्य केंद्रातील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शासकीय आरोग्य विभागाच्या खांद्याला खांदा लावून मेहनत घेतली म्हणून कोरोनाला आपण राज्यभरातून हरवू शकलो. आता कोरोनाचा समूळ नायनाट करण्यासाठी राज्य शासनाने आपल्याकडे लस पाठवली आहे. मनात कोणतीही भीती न बाळगता, अफवांना बळी न पडता सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या शिवाजीराव सिरसाट यांनी केले. लसीकरणाच्या प्रारंभ कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
शासकीय रुग्णालयातील मुलांच्या वसतिगृहातील इमारतीमध्ये आयोजित या कार्यक्रमात आ. नमिता मुंदडा, आ. संजय दौंड , जि. प. उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, प्रभारी अधिष्ठाता डॉ. धपाटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राकेश जाधव, डॉ. बिराजदार, उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे, जि. प. सदस्य शंकरराव उबाळे, नगरसेवक सारंग पुजारी, शिनगारे, भराडीया, पाथरकर, ताहेरभाई, खलील मौलाना सह आदी उपस्थित होते.
यावेळी लसीकरणासाठी नाव नोंदणी करणाऱ्या खासगी रुग्णालयाच्या डॉ. शितल विलास सोनवणे, डॉ. सचिन पोतदार, डॉ. वैशाली पोतदार, परिचारिका मस्के आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी जि. प. उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, आ. नमिता मुंदडा, आ. संजय दौंड, प्रभारी अधिष्ठाता डॉ. धपाटे यांनी मनोगत व्यक्त केले. लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. वेदपाठक यांनी लसीकरणासाठी नोंदणीची प्रक्रिया सांगत लसीमुळे कुठलाही त्रास होणार नसून, लस घेतल्यानंतर अर्धा तास त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार असून, कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले. सूत्रसंचालन वैद्यकीय उप अधीक्षक डॉ. विश्वजित पवार यांनी केले. लसीकरणाच्या कार्यक्रमाला आरोग्य विभागातील डॉ. मोरतळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लोमटे, डॉ. अरुणा केंद्रे, डॉ. जाधव तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. राकेश जाधव, मेटर्न भताने मॅडम, डॉ. लामतुरे, डॉ. कचरे, डॉ. बिराजदार, डॉ. प्रशांत देशपांडेंसह रुग्णालयातील इतर विभागप्रमुख डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका आदी उपस्थित होते.