लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्य व केंद्र शासनाच्या वतीने आलेले अनुदानाचे पैसे त्यांना काहीसा दिलासा मिळण्याची आशा होती. मात्र, या अनुदानापैकी सर्वात जास्त रक्कम ही जिल्हा बँकेत जमा आहे. परंतु जिल्हा बँक व काही ठिकाणी तलाठ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी अजून देखील अनुदानापासून वंचीत आहेत.जिल्ह्यात तीव्र दुष्काळ जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन टप्प्यात जवळपास ४२८ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर त्याचे पैसे देखील जिल्हा प्रशासनाकडे आले. त्यानूसार प्रशासनाकडून हे सर्व अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी संबंधीत सर्व बँकामध्ये जमा केले. या अनुदानाची जवळापास २५० ते ३०० कोटी रुपये हे जिल्हा बँकेत जमा केले आहेत. पैसे जमा होऊन दिड ते दोन महिने झाले आहेत. मात्र, अजून देखील बहूतांश शेतकरी या मदतीपासून वंचित असल्याचे चित्र आहे. संबंधीत बँक व्यवस्थापकाशी बोलल्यानंतर योग्य पद्धतीने उत्तरे दिली जात नसल्याचे देखील शेतकऱ्यांमधून सांगण्यात आले. जिल्हा बँकेच्या शाखा इतर बँकेच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. त्यांमुळे तात्काळ शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहचावी यासाठी प्रशासनाच्या वतीने ही रक्कम जिल्हा बँकेत जमा केली जाते. परंतु अनुदान वाटप करण्यास अक्षम्य हलगर्जीपणा जिल्हा बँकेकडून होत असून अनुदानाचे पैसे बहुतांश शेतक-यांना मिळालेले नसल्यामुळे शेतक-यांवर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात जिल्हा बँकेचे व्यवस्थापक देशमुख यांना विचारले असता ते म्हणाले वर्णमालेनुसार पैसे वाटप करण्यात येत आहेत त्यामुळे उशीर लागत आहे.अनुदानाचा आम्हाला फायदा काय ?दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांना शासनाच्या वतीने अनुदान दिले आहे. मात्र, वेळेवर अनुदानाचे पैसे मिळत नसतील तर दुष्काळी किंवा इतर अनुदानाचा फायदा काय असा प्रश्न शेतक-यांमधून विचारला जात आहे. तात्काळ अनुदानाची शिल्लक रक्कम वाटप करण्यात यावी अशी मागणी युवराज जगताप, महारुद्र वाघ, विक्रम खंडागळे, अशोक जगतपा, गणेश बहिरवाळ आदी. शेतक-यांनी केली आहे.तलाठ्यांची होणार चौकशी२०१६ साली झालेल्या अतिवृष्टी झाल्यामुळे त्याची मदत २०१८ च्या शेवटी जाहीर करण्यात आली होती. त्याची रक्कम देखील जिल्हा बँकेत जमा करण्यात आली आहे.यामध्ये अल्पभूधारक शेतक-यांना वगळून काही ठिकाणी तलाठ्यांनी मनमानी कारभार केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी असा प्रकरा करणा-या तलाठ्यांना नोटीस देऊन त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.दोषी आढळल्यानंतर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या अनुदानाचे ६८ कोटी रुपये देखील बँकेत जमा होऊन चार ते साडेचार महिने होत आहेत, मात्र अजून देखील अनेक शेतकरी या मदतीपासून वंचित असल्याची माहिती आहे.
दुष्काळ, अतिवृष्टीचे अनुदान मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 12:28 AM