सखाराम शिंदे
गेवराई : तालुक्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना येथील कोविड केअर सेंटरमधील जागा अपुरी पडत असल्याने शहरातील र. भ. अट्टल महाविद्यालयातील महिला वसतिगृह, दारूलउलुम, भगवती चित्र मंदिर, केंब्रिज इंग्लिश स्कूल या नव्या जागी कोविड सेंटर उभारणीला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे, तहसीलदार सचिन खाडे व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. महादेव चिंचोळे यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. तालुक्यातील दररोज कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता शहरातील उपजिल्हा रुग्णालय ६०, छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे ८० बेड, कस्तुरबा गांधी विद्यालयात १३० तसेच गढी येथील अध्यापक विद्यालयात १०० अशा चार ठिकाणी सध्या कोविड सेंटर चालू आहेत. येथील क्षमता पूर्ण झाल्याने वाढती रुग्णसंख्या पाहता जागा अपुरी पडू नये म्हणून तहसीलदार सचिन खाडे यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडे शहरात नवीन कोविड सेंटरची मागणी केली होती. त्यापैकी एक दारूलउलूम येथील १०० खाटांचे कोविड सेंटर शनिवारी सुरू करण्यात आले, तर उर्वरित मागणी केलेल्या र. भ. अट्टल महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात ६०, भगवती चित्र मंदिर ८० आणि केंब्रिज इंग्लिश स्कूल येथे १६० खाटांचे नवीन कोविड सेंटर सुरू करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे.
सेंटर लवकरच सुरू होणार
तालुक्यातील रुग्णसंख्या वाढली तरी आता जागा अपुरी पडणार नाही. तसेच हे सर्व कोविड सेंटर लवकरच सुरू होतील, असे येथील तहसीलदार सचिन खाडे व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. महादेव चिंचोळे यांनी सांगितले.