बीड : गेवराई मतदारसंघात पंडित काका-पुतण्यात पुन्हा एकदा लढाई होत आहे. २०१९ मध्येही या दोघांमध्ये मतविभाजन होऊन भाजपच्या लक्ष्मण पवारांना फायदा झाला होता. आता यावेळी पंडितांसह पवार मैदानात आहेत. पवार हे सलग दोनवेळा आमदार राहिले असून सध्या हॅटट्रिकवर आहेत.
गेवराई मतदारसंघातील मतदारांची संख्या ३ लाख ७४ हजार एवढी आहे. २०१९ मध्ये भाजपचे लक्ष्मण पवार आणि राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित यांच्यात थेट लढत झाली होती; परंतु अपक्ष म्हणून बदामराव पंडित यांनीही अर्ज दाखल केला. यामुळे विजयसिंह यांच्या मतांची गणिते बिघडली आणि पवारांनी गुलाल उधळला. यावेळी राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्याने उमेदवारांचे पक्षही बदलले आहेत. सध्या महायुतीकडून अजित पवार गटाचे विजयसिंह पंडित आणि महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे बदामराव पंडित मैदानात आहेत. सलग दोनवेळा भाजपकडून आमदार राहिलेले लक्ष्मण पवार यांनी यावेळी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. पंडित हे नात्याने काका-पुतण्या आहेत. तिघेही मराठा असल्याने जातीय समीकरणे येथे फार कामी येणार नाहीत. तर दुसऱ्या बाजूला मराठा समाजातीलच २८ वर्षांची तरुणी पूजा मोरेही तिसऱ्या आघाडीकडून रिंगणात असून या तिन्ही मराठा उमेदवारांना आव्हान देत आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे: - गेवराई मतदारसंघात १९६२ पासून पवार, पंडित यांच्याच घरात आमदारकी राहिलेली आहे, त्यामुळे लोक आता नाराज आहेत.- पवारांकडून पंडित मुक्तीचा, तर पंडितांकडून पवार मुक्तीचा नारा दिला जात आहे.- पंडित, पवार यांना तीन महिला उमेदवारांनीही आव्हान देत आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.- पवार यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी दाखल केली.- अर्ज भरण्यापूर्वी लक्ष्मण पवारांबाबत अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या होत्या.