बीड : गेवराई शहरात पुष्पा शर्मा या वृद्धेचा खून करून सव्वा सात लाख रूपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला होता. या घटनेला पंधरवाडा उलटला तरी अद्याप पोलिसांना याचा तपास लागलेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार आतापर्यंत जवळपास सव्वाशे गुन्हेगारांची तपासणी केली आहे. दरम्यान, निवडणुक बंदोबस्तामुळे सहा ऐवजी तीनच पथकांमार्फत याचा तपास सुरू आहे.
१ एप्रिल रोजी गेवराई शहरातील खडकपूरा भागात राहणाऱ्या पुष्पा शर्मा यांच्या घरी दरोडा टाकण्यात आला होता. यामध्ये शर्मा यांचा खून करून दरोडेखोरांनी तब्बल सव्वा सात लाख रूपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला होता. त्यानंतर तात्काळ याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक, गेवराई पोलीस असे सहा पथके नियूक्त केली होती. या पथकाकडून गुन्हेगारी वस्त्यांची झडती घेतली जात आहे. तसेच तरूंगातून बाहेर आलेले, फरार असलेले आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी केली जात आहे. मात्र अद्यापही त्यांना मुख्य आरोपीपर्यंत पोहचता आलेले नाही.
दरम्यान, सध्या लोकसभा निवडणूकांचा बंदोबस्त असल्याने या प्रकरणाच्या तपासातील तीन पथके इतरत्र नियूक्त केली आहेत. सध्या तीनच पथके याचा तपास करीत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे एक, दरोडा ्रप्रतिबंधकचे एक आणि गेवराईचे एक असे तीन पथके आहेत. या तीनही पथकांकडून कसून तपास सुरू असला तरी अद्याप त्यांना यात यश आलेले नाही. याचा तपास लवकर लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
एएसपी गेवराईत तळ ठोकूनहे प्रकरण झाल्यानंतर खुद्द पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी दोन वेळेस गेवराईला भेट दिली. तर अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे हे तळ ठोकून आहेत. प्रत्येक दिवसाचा आढावा पथकांमार्फत घेतला जात आहे. आता निवडणूक बंदोबस्त आणि रखडलेल्या गुन्ह्यांचा तपास, असे दोन आव्हाने पोलिसांसमोर आहेत.
तपास सुरूच आहेबंदोबस्तामुळे सहा ऐवजी तीन पथके तपास करीत आहेत. आतापर्यंत जवळपास सव्वाशे गुन्हेगारांची तपासणी केली आहे. तपास आणि चौकशी सुरूच आहे. लवकरच आरोपींना अटक करू.- अर्जून भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी, बीड