माजलगाव (बीड ) : तालुक्यातील आनंदगाव येथे दुष्काळामुळे भीषण परिस्थिती आहे. यावर त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने माजलगाव पंचायत समिती कार्यालयावर बुधवारी (दि.२९) घागर मोर्चा काढण्यात आला.
तालुक्यात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. तसेच जनावरांनासुद्धा पाणी मिळत नाही. यावर तालुका प्रशासनाकडून कुठलीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. यामुळे दिवसेंदिवस पाणी समस्या बिकट होत चाली आहे. तालुक्यातील आनंदगाव येथे भयंकर पाणी समस्या निर्माण झाली. यावर उपाययोजना करत आनंदगावसाठी धरणातून थेट जलवाहिनी टाकण्यात यावी, या मागणीसाठी पंचायत समिती कार्यालयावर शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने घागर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व गंगाभिषण थावरे यांनी केले. यावेळी मोठ्याप्रमाणावर ग्रामस्थ सहभागी होते. गटविकास अधिकारी वि.टी. चव्हाण यांना आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन दिले.