दीपक नाईकवाडे
केज : तालुक्यातील नाव्होली येथील ६५ शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात ११० हेक्टर जमिनीवर घेवडा (राजमा) पीक घेत प्रत्येक शेतकऱ्याने ८ ते १० क्विंटल घेवड्याचे उत्पन्न काढले, तर गावात ३७५ टन उत्पन्न निघाले आहे. व्यापाऱ्यांनी गावात येऊन आठ हजार रुपये प्रती क्विंटल भावाने घेवडा खरेदी केला. त्यातून गावात तीन कोटी रुपयांचे उत्पन्न निघाले आहे.
नाव्होली येथील प्रयोगशील शेतकरी खंडू येडबा बिक्कड व रंजित वामनराव बिक्कड हे पर्यायी पिकाच्या शोधात होते. त्यांना कृषी कार्यालयाकडून घेवडा (राजमा) पीक घेण्याचा सल्ला मिळाला. त्यानुसार सहा एकर क्षेत्रावर त्यांनी खरिपात घेतले जाणारे पीक रब्बी हंगामात घेतले. त्यांना एकरी आठ क्विंटल उत्पन्न मिळाले. त्याला ६,२०० रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला. एकरी खर्च वजा जाता ४२ हजार रुपये उत्पन्न मिळाले.
यंदाच्या रब्बी हंगामात मागील वर्षी आलेल्या सकारात्मक परिणामामुळे हरभरा, रब्बी ज्वारी या पिकाला पर्याय म्हणून घेवडा या पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी सरपंच मीनाबाई दिलीप बिक्कड यांनी पुढाकार घेतला, तर शेतकरी खंडू बिक्कड, रंजित बिक्कड व कृषी सहायक एम. एस. वाकळे यांनी बियाणे उपलब्ध करण्याची व खरेदीची हमी घेतली. त्यामुळे ६५ शेतकऱ्यांनी ११० हेक्टर क्षेत्रावर हे पीक घेतले. कमी कालावधीचे असल्याने १५ ते ३० ऑक्टोबर व १० ते १५ जानेवारी असे दोन वेळा पीक घेतले. गावात घेवड्याचे ३७५ टन उत्पन्न निघाले आहे. गावात येऊन व्यापाऱ्यांनी ८,००० रुपये प्रती क्विंटल भाव देत ते खरेदी केले. ३७५ टन घेवड्याच्या उत्पन्नातून गावातील शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन कोटी रुपयांहून अधिक रक्कम बँक खात्यात जमा झाली आहे, तर एकरी ८ ते १० क्विंटल उत्पन्न धनराज रामहरी बिक्कड, पुरुषोत्तम निवृत्ती बिक्कड, गहिनीनाथ बाबूराव बिक्कड, रामहरी विश्वनाथ बिक्कड, सखाराम गणपती शिंदे, गोविंद नवनाथ बिक्कड, हरिदास बळिराम बिक्कड, कुंडलिक शामराव देशमुख या शेतकऱ्यांनी काढले आहे. प्रयोगशील शेतकरी खंडू बिक्कड, रंजित बिक्कड, कृषी सहायक एम. एस. वाकळे यांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले आहे.
गावातील शेतकऱ्यांनी मेहनत घेतली, तर कृषी सहायक एम. एस. वाकळे यांनी वेळोवेेेळी मार्गदर्शन केले. विक्रमी उत्पादनामुळे व बाजारभावामुळे शेतकऱ्यांचा कल घेवड्याचे पीक घेण्यासाठी राहील. कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे तालुक्यात घेवडा पिकाचे क्षेत्र येणाऱ्या रब्बी हंगामात वाढेल. - चंद्रकांत देशमाने , तालुका कृषी अधिकारी, केज.
शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्वक राजमा पिकाची शेती केली. बऱ्याच शेतकऱ्यांनी ऊस पिकाऐवजी राजमा हे पीक निवडले. त्यातून त्यांना चांगला आर्थिक लाभ झाला. ऊस पिकाला राजमा हे हंगामी बागायत पीक हा चांगला पर्याय आहे.
- दिलीप बाबूराव बिक्कड, नाव्होली, ता. केज.
===Photopath===
120521\deepak naikwade_img-20210512-wa0017_14.jpg~120521\deepak naikwade_img-20210512-wa0016_14.jpg