माजलगाव : कोरोना आजार हा खूप मोठा नसून, सर्वत्र बनलेले नकारात्मक वातावरण मात्र घातक ठरत आहे. परंतु आवश्यक ती काळजी, डाॅक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार, उंच मनोबल, धैर्य राखून प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर निश्चितच कोरोनावर मात करणे शक्य असल्याचे ७० वर्षांच्या भागीरथीबाई गिरी आणि ७५ वर्षांचे बाबूराव गिरी यांनी दाखवून दिले.
शहरातील मंगलनाथ काॅलनीतील गिरी दाम्पत्य २५ वर्षांपासून उच्च
रक्तदाब व मधुमेहाचे रुग्ण आहेत. त्यात बाबूराव गिरी यांची काही वर्षांपूर्वीच पुणे येथे बायपास सर्जरी झाली. एक महिन्यापूर्वी दोघांनाही ताप व खोकल्याची लक्षणे दिसल्याने तपासणी केली. यात भागीरथीबाईंचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आता, तर बाबूराव गिरी यांचा एचआरसीटी स्कोअर ०९ आला. शहरातील खासगी कोविड केअर सेंटरमध्ये बाबूराव गिरी यांच्यावर उपचार झाले, तर भागीरथीबाई यांना घरातच विलगीकरणात ठेवण्यात आले. यादरम्यान वेळोवेळी त्यांना दिलेला डबा, आवश्यक ती घेतलेली काळजी आणि कोरोनावर विजय मिळवायचाच या निश्चयाने पंधरा दिवसांत दोघेही उपचार घेत कोरोनावर यशस्वी मात करत ठणठणीत झाले आहेत. डाॅ. जी. आर. देशपांडे, डाॅ. श्रेयस देशपांडे, डाॅ. मकरंद पत्की व संदिकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले योग्य उपचारही कामी आल्याचे गिरी दाम्पत्यांनी सांगितले.
घरात लहान-मोठे २१ सदस्य आहेत. परंतु सर्वांनी योग्य खबरदारी घेतल्याने मोठे कुटुंब असतानाही इतर कोणीही बाधित झाले नाही. योग्य ती काळजी व खबरदारी घेतल्यानेच हे शक्य झाले. मास्क, सतत हात धुणे, योग्य अंतर ठेवणे हीच कोरोनावर मात करण्याच्या यशाची किल्ली आहे. - भागीरथीबाई गिरी, माजलगाव.
कोरोनाकाळात मुलगा रमेश गिरी यांनी आमची काळजी घेत जेवण, औषध-गोळ्या देणे यासोबत मानसिक आधार देण्याचे काम केले. आपल्याला वाळीत टाकल्याची भावना निर्माण होऊ दिली नाही. न घाबरता योग्य ती काळजी घेतल्याने या संकटातून लवकरच सुटका झाली. - बाबूराव गिरी, माजलगाव.
कोरोनाला घाबरू नये, अंगदुखी, अशक्तपणा, ताप असल्यास तात्काळ तपासणी करावी. निदान लवकर झाल्यास उपचार करणे सोपे होते. रुग्णांनी तपासणी करून लवकरात लवकर डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. कोरोना संपूर्णपणे बरा होतो. - डाॅ. श्रेयस देशपांडे, संचालक, कोविड हाॅस्पिटल, माजलगाव.
===Photopath===
300421\purusttam karva_img-20210428-wa0078_14.jpg