गेवराई : बसमधून उतरल्यावर रस्ता ओलांडून घराकडे जाणाऱ्या तिघांना औरंगाबादकडून बीडकडे जात असलेल्या एका ट्रकने धडक दिली. यामध्ये दोन बालकासह माता गंभीर जखमी झाले होते. यातील आठ महिन्यांच्या मुलीचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास धुळे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गॅस एजन्सी समोर घडला होता. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
शेख तन्वीर हे शहरातील दारलुम भागातील रहिवासी आहेत. २० एप्रिल रोजी ते परिवारासह बीड येथे काही कामानिमित्त गेले होते. दरम्यान काम आटोपून गेवराईकडे बसमध्ये आले. गेवराई जवळील प्रथमेश गॅस एजन्सीजवळ बसमधून उतरले.
रस्ता ओलांडून घराकडे जात असताना अचानक औरंगाबादहून बीडकडे जात असलेल्या या ट्रकने मारेफत शेख मझर (वय ८ महीने) रेहान शेख तन्वीर (वय ५ वर्षे) व मुलीची आई अफरीना शेख मझर यांना जोराची धडक दिली. यामध्ये मारेफत शेख मझर व रेहान शेख तन्वीर हे गंभीर जखमी झाले होते. यातील जखमींवर येथील एका खाजगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बीड येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे.
दरम्यान उपचार सुरू असलेल्या मारेफत शेख मझर या लहान मुलीचा मंगळवारी रात्री उशिरा मृत्यू झाला असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या प्रकरणी सदरील ट्रक चालकाविरूद्ध शेख शब्बीर शेख इस्माईल यांच्या तक्रारीवरून गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.