लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शाळकरी मुलीचा पाठलाग करुन छेडछाड केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात २१ वर्षीय तरुणाला दोषी ठरवून सहा महिन्यांची शिक्षा येथील विशेष सत्र न्या. क्र. १ बी. व्ही. वाघ यांच्या न्यायालयाने सोमवारी सुनावली.
शहरातील रहिवासी एका मुलीचा शुभम आनंद सरवदे (वय २१) नामक तरुण सातत्याने पाठलाग करत होता. ही मुलगी दहावीत शिकत असताना तो तिला त्रास देत होता.नंतर ती लातुर येथे शिक्षण घेत होती. त्यावेळी तो तिचा पाठलाग करायचा. ती दिसली की ओरडायचा. याबाबत पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली होती. दरम्यान १ जुलै २०१६ रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होता. त्यामुळे शुभम सरवदे याच्याविरुध्द कलम ३५४ (ड) १२, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालिन सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. देवकर यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणात पीडित मुलगी, तिचे वडील, मामा आणि तपासी अधिकाऱ्याचे जबाब नोंदविण्यात आले. सुनावणीदरम्यान हे जबाब महत्वपूर्ण ठरले. न्यायालयाने शुभम सरवदे यास दोषी ठरवून कलम १२ (पोक्सो)अंतर्गत सहा महिन्याची शिक्षा तसेच कलम ५०६ नुसार एक महिन्याची शिक्षा व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील अॅड. मिलींद वाघिरकर यांनी काम पाहिले.
धाक निर्माण होईलमुलींची छेडछाड, पाठलाग करणे असे प्रकार तरुणांना किरकोळ वाटतात. विशेष न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरुन धडा घेण्याची गरज आहे. पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्यास संबंधित आरोपीला चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्राची तसेच माफीची तरतूद नाही. या निर्णयामुळे छेडछाड करणाºयांना कायद्याचा धाक बसणार असल्याच्या प्रतिक्रिया सामान्यांमधून व्यक्त होत होत्या.