रिॲलिटी चेक
बीड : जिल्हा रुग्णालयात यापूर्वी डॉ. सूर्यकांत गित्ते जिल्हा शल्य चिकित्सक असताना परिस्थिती बिघडल्याची ओरड होती. त्यांना बदलून डॉ. सुरेश साबळे यांच्याकडे पदभार दिला. परंतु, त्यांनाही सुधारणा करण्यात अपयश आले आहे. आजही स्थलांतरित जिल्हा रुग्णालयात नॉनकोविड रुग्णांचे हाल कायम आहेत. बुधवारी दुपारी व गुरुवारी सकाळी मानसोपचार तज्ज्ञासह डोळे व आयुषच्या डॉक्टरांनी ओपीडीला दांडी मारली होती. हे वास्तव अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांनीही मान्य केली असून, नोटीस काढणार असल्याचे सांगितले.
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर लाखो रुपये वेतन घेतात. परंतु ते रुग्णसेवा देताना आखडता हात घेत असल्याचे वारंवार समोर आले आहे. वरिष्ठांकडून केवळ तोंडी सूचना देऊन चमकोगिरी केली जाते. परंतु एकाही डॉक्टरवर आतापर्यंत कारवाई झालेली नाही. त्यामुळेच डॉक्टरांचा कामचुकारपणा वाढत आहे. यापूर्वी डॉ. गित्ते असतानाही परिस्थिती बिघडली होती. आता डॉ.साबळे आल्यावर त्यात सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. सुरुवातीला काही दिवस फरकही पडला. परंतु, ही केवळ चमकोगिरी ठरली. त्यांचा डॉक्टरांवर दबाव नसल्याने आजही ते ओपीडीत न बसता रुग्णांना वाऱ्यावर सोडून गायब होत आहेत. या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
आता पुन्हा नोटिसांचा पाहुणचार; सुधारणा कधी
डॉक्टरांची हलगर्जी, दुर्लक्षपणा, गैरहजर आदींबाबत संबंधिताला केवळ नोटिसांचा पाहुणचार केला जातो. त्यांच्याकडून आलेला खुलासा मान्य करत त्यांना माफ केले जात आहे. आता याची सामान्यांना सवयही झाली आहे. नोटीस पाठवून स्वत:चे ‘उखळ’ पांढरे करण्याचे काम वरिष्ठ अधिकारी करत असल्याचा आरोप होत आहे.
कोण होते गैरहजर
बुधवारी दुपारी मानसोपचार विभागात केवळ एक कर्मचारी होता. डॉक्टर गायब होते. तसेच आयुष विभागही वाऱ्यावर होता. गुरुवारी सकाळी पुन्हा पाहणी केली असता मानसोपचार विभागात एक नर्स व कर्मचारी होते. डॉक्टर पुन्हा गायब होते. क्षयरोग विभागही वाऱ्यावर होता. दरवाजात शिपाई डॉक्टरांची प्रतीक्षा करत असल्याचे दिसले.
---
मानसोपचार विभागातील डॉ.मोगले, नेत्रतज्ज्ञ डॉ.जाजू, आयुषचे डॉ.वारे दांपत्य, डॉ.हानिमा हे गैरहजर होते. त्यांना नोटीस काढल्या आहेत. सीएस डॉ. साबळे व मी राउंड घेतला आहे. बाकी सर्व डॉक्टर उपस्थित होते.
डॉ. सुखदेव राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, बीड
120821\12_2_bed_5_12082021_14.jpeg
क्षयरोग विभागातील खू्र्च्या गुरूवारी सकाळी १० वाजता डॉक्टरांच्या प्रतिक्षेत होत्या.