बीड : वंजारी समाजाला देण्यात आलेले २ टक्के आरक्षण हे लोकसंख्येच्या तुलनेत कमी आहे. त्यामध्ये वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारोच्या संख्येने वंजारी समाजातील नागरिक सहभागी झाले होते.
राज्यात वंजारी समाजाला एनटी.डी प्रवर्गातून २ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र, हे आरक्षण तोकडे आहे. त्यासाठी देखील समाजाला संघर्ष करावा लागला होता. लोकसंख्येच्या प्रमाणात हे देण्यात आलेले २ टक्के आरक्षण कमी आहे. वंजारी समाजाला वाढीव आरक्षण देण्याची मागणी आरक्षण कृती समितीच्या वतीने करण्यात आली होती. मंगळवारी काढण्यात आलेला मोर्चा बीड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघालेला मोर्चा शिवाजी महाराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. येथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. मोर्चाचे नेतृत्व समाजातील मुलींनी केले. शासनाने मागण्यांचा विचार करुन तात्काळ निर्णय घेण्याचे आवाहन आंदोलकांनी केले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले. तसेच मागण्या मान्य न झाल्यास विधानसभा निवडणुकीवर समाज बहिष्कार टाकेल तसेच जिल्हानिहाय मोर्चे काढण्यात येतील असा इशारा यावेळी कृती समितीने दिला.
या आहेत प्रमुख मागण्या - जातनिहाय जनगणना करण्यात यावी- वंजारी समाजाला १० टक्के आरक्षण द्यावे- उद्योग व्यावसायासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध व्हावे- समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय वसतीगृह व्हावेत- कै. गोपीनाथराव मुंडे महामंडळ स्थापन करावे