लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : सामाजिक न्याय विभागाअंतर्गतच्या निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक ॲप्स असलेल्या मोबाईलचे पायलट प्रोजेक्ट म्हणून विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात यावे, अशी मागणी महात्मा फुले आश्रमशाळेचे अध्यक्ष सुरेश यादव यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
राज्यातील सर्व निवासी आश्रमशाळा गेल्या एक वर्षापासून कोरोना संसर्ग आजारामुळे बंद आहेत. अशावेळी ९० टक्के पालकांकडे अँड्रॉइडचे मोबाईल नसल्याने ऑनलाईनपासून बरेचसे विद्यार्थी वंचित राहात आहेत. अशावेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पालकांची अत्यंत गरिबीची परिस्थिती असल्याने त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध नाहीत. निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे पालक हे अत्यंत गरीब, कष्टकरी, मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत आहेत. अशा वेळेला राज्य सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने विद्यार्थ्यांसाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून जिओसारख्या कंपनीचा अल्पदरातील मोबाईल घेऊन तो राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत देण्यात यावा. या मोबाईलमध्ये विनाजाहिरात फक्त शैक्षणिक रेडिओ शैक्षणिक कार्यक्रम ॲप्स असलेल्या मोबाईलची मागणी सरकारच्या वतीने कंपनीकडे करावी. मोबाईल हँडसेट प्रत्येक गरीब, गरजू विद्यार्थ्यांना वाटप करावा. याकरिता कंपन्यांकडून सीएसआर निधी उभा करून मार्ग काढावा. काळाची गरज म्हणून प्राधान्याने या शैक्षणिक कार्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी विनंतीही यादव यांनी पत्राद्वारे केली आहे.