अंबाजोगाई (बीड) : शासकीय जमीनीवर बेघरांना ‘सर्वांसाठी घरे' योजनेतून घरे मिळावीत या प्रमुख व इतर 6 मागण्यांसंदर्भात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने सोमवारी (दि. 17 ) नगर परीषद कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.
शहर व परिसरात राहणारा शिकलकरी समाज व वंचित घटकातील गोर-गरिबांना अंबाजोगाई येथील सरकारी जमिनीवर स्थलांतरीत करून कायमचे घर देण्यात यावे, सर्व्हे नं.515 मधील न.प. मालकीची जागा ताबडतोब ताब्यात घेवून त्यावरील तसेच मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवा,संबंधित अभियंत्याचा विभाग बदला,सर्व गलिच्छ वस्त्यांची स्वच्छता करा, शहराची अंतर्गत पाईप लाईन बदलून आठवड्यातून दोनदा पिण्याचे पाणी द्यावे या व इतर मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. विविध निवेदने,अर्ज,विनंत्या करूनही या प्रश्नी न्याय मिळत नसल्याने अखेर बब्रुवाहन पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली शिकलकरी समाज व वंचित घटकातील शेकडो गोर-गरीब,मजुर लोकांनी आज नगरपरीषद कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली.
शासकीय जमीनीवर बेघरांना ‘सर्वांसाठी घरे' योजनेतून घरे मिळावीत या प्रमुख व इतर 6 मागण्यांसंदर्भात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते बब्रुवाहन पोटभरे हे सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र प्रशासन या बाबत उदासीन असल्याचे पोटभरे यांनी सांगितले. बब्रुवाहन पोटभरे, पुनमसिंग टाक, छायाबाई तरकसे, गोरखसिंग भोंड, अस्मिता ओहाळ, दिपकसिंग गोके,पुजा मोरे,विरसिंग टाक, अनिल ओहाळ,अशोक ढवारे,तेजासिंग गोके, मिरा पाचपिंडे, मिरा जोगदंड आदींच्या स्वाक्ष-या आहेत. मोर्चात सार्वजनिक बांधकाम विभाग परिसरातील शिकलकरी समाज, मिलींदनगर व येल्डा रोड परिसरातील शेकडो बेघर कुटुंबे,वंचित समाज बांधव हे सहभागी झाले होते.