बीड : कोरोनाबाधितांवर उपचार करणारे डॉक्टर, कर्मचारी पीपीई कीटला चांगलेच वैतागले आहेत. धुलिवंदनाच्या दिवशी रात्रीच्या सुमारास जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी कोरोना वॉर्डचा आढावा घेतला. यावेळी डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी खराब पीपीई कीट बद्दल नाराजी व्यक्त केली. सर, एक तास जास्त ड्यूटी द्या, पण पीपीई कीट बदला, अशी विनवणी ते करीत होते.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे खाटा अपुऱ्या पडत आहेत. तसेच उपचार व सुविधांबद्दलही तक्रारी वाढत आहेत. हाच धागा पकडून जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी सोमवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास अचानक जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डला भेट दिली. कक्षात दाखल होताच त्यांनी आढावा घेण्यास सुरुवात केली. रुग्णांशी संवाद साधण्यासह केलेल्या उपचारांची पाहणी केली. डॉक्टर, परिचारिकांकडून आढावा घेतला. काही रुग्णांनी तक्रारी केल्या तर काहींनी उपचाराबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.सुखदेव राठोड, तहसीलदार शिरीश वमने, डॉ.सचिन आंधळकर, डॉ.बाबासाहेब ढाकणे आदींची उपस्थिती होती.
ब्रदरकडून नातेवाईकांना हिन वागणूक
जगताप आढावा घेत असतानाच एक आई आपल्या तीन मुलांबद्दल समस्या मांडण्याचा प्रयत्न करीत होती. एवढ्यात येथील शकील नामक ब्रदरने 'काय आहे, चला व्हा तिकडे' असे म्हणत रोखले. परंतु हा प्रकार 'लोकमत'ने तहसीलदारांच्या लक्षात आणून दिला. या मातेचे तीनही मुले बाधित होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास असतानाही सीसीसीमध्ये जाण्याचा आग्रह केला जात होता. त्यांना पाठवू नये, एवढीच तिची विनंती होती. तहसीलदारांनी त्यांना पाठवू नये, अशा सूचना केल्या. शिवाय ब्रदर शकीललाही 'नीट बोला' असे म्हणत कान उघडणी केली. हा सर्व प्रकार एनआरसी विभागात घडला.
केवळ जिल्हाधिकारी, सीएसनेच घातली कीट
सोमवारी आढावा घेताना केवळ जिल्हाधिकारी जगताप व शल्य चिकित्सक डॉ.गित्ते यांनीच ही कीट वापरली होती. इतर कोणीच कीट वापरली नाही. यावरुन सर्वच लोक कीटच्या त्रासाला घाबरत असल्याचे दिसते. कीट घातलेले दोन्ही अधिकारीही केवळ २० मिनिटांत खाली परतले आणि पटकन कीट काढली. ते घामाघुम झाले होते. २० मिनिटांत घामाघूम झालेल्या अधिकाऱ्यांना ८ तास कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या व्यथा समजतील का? कीट बदलतील का? असा प्रश्न आजही कायम आहे.
सीएसने घेतला सकाळी राऊंड
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांनीही सकाळीच राऊंड घेत सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. ऑक्सिजन पुरवठा आणि खाटांची माहिती घेत यंत्रणेला सूचना केल्या. तसेच रुग्णांशी संवाद साधत डॉक्टर, परिचारिकांना उपचार दर्जेदार व वेळेत करण्याबाबत सूचना केल्याचे सांगण्यात आले.
'लोकमत'ने उठविला आवाज
पीपीई कीटमधील संघर्षाला घेऊन लोकमतने डॉक्टर, परिचारिका, कक्षसेवक, कर्मचारी यांच्याशी संवाद साधत वृत्त प्रकाशित करुन प्रशासनाच्या निदर्शनास आणले. तसेच त्यांना या कीटमध्ये कशाप्रकारे त्रास होतो, याची माहिती दिली. लोकमतने आवाज उठविल्यानंतर सर्वांनीच आभार मानले होते. आता याच मुद्यावर जिल्हाधिकाऱ्यांपुढे सर्वांची थेट कैफियत मांडली. 'लोकमत'ने संघर्ष करणाऱ्या व अडचणीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची बाजू घेत कायम आवाज उठविलेला आहे.
===Photopath===
300321\302_bed_13_30032021_14.jpeg
===Caption===
जिल्हा रूग्णालयात रूग्णांशी संवाद साधत डॉक्टर, परिचारीकांकडून माहिती घेताना जिल्हाधिकारी रविंद्र जगताप. सोबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.सुखदेव राठोड, तहसीलदार शिरीश वमने, डॉ.सचिन आंधळकर, डॉ.बाबासाहेब ढाकणे, कॉलमॅन गणेश पवार आदी.