कडा : गायरान जमीन ही शासनाची आहे. तिथे हे माझं, हे तुझं करून आपापसांत भांडणे करू नका; नसता पोलिसांच्या कारवाईला सामोरे जाल, अशी तंबी तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी वादग्रस्त ठरत असलेल्या गायरान जमिनीवर हक्क दाखवणाऱ्या लोकांना दिली. ज्यांच्याकडे वहिती करीत असलेले पुरावे असतील तर ते सादर करा, अशी सूचनाही त्यांनी केली.
आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथील जमीन अमिया नावाच्या महिलेने अनेक वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीला दान दिलेली आहे. ग्रामपंचायतीने ही जमीन तशीच ठेवली व ती कायम पडीक राहिली; पण हीच पडीक जमीन वहितीसाठी कडा येथील अनुसूचित जातीतील लोक करत होते. नंतर पारधी समाजातील काही लोकांनी त्या जमिनीवर आपला हक्क दाखवल्याने मागील काही दिवसांपासून वाद धुमसत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कानावर ही बाब जाताच शनिवारी तिथे जाऊन दोन्ही बाजूंच्या लोकांची समजूत घालण्यात आली. त्यानंतर तहसीलदार कदम यांनी ही गायरान जमीन शासनाची आहे. कोणीही हक्क दाखवू नका. तुमच्याकडे वहिती करीत असल्याचा पुरावा असेल तर तो सादर करा. पण आपापसांत भांडणे करू नका, नसता पोलीस कायदेशीर कारवाई करतील, असा इशारा दिला.