लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा रूग्णालयातील कोरोना वाॅर्डमध्ये डॉक्टर वेळेवर जात नाहीत. ऑक्सिजन बंद पडला तरी नर्स पाहत नाही. उलट हे माझे काम नाही, असे उद्धट उत्तर नातेवाईकांना देतात, याबाबतच्या तक्रारी वाढल्या आहेत. याच तक्रारी कमी करण्यासाठी सेवा चांगली द्या. तरच या तक्रारी कमी होतील. कागदावर छान काम आहे, पण प्रत्यक्षात ते दिसत नसल्याची खंत व्यक्त करीत उपसंचालक डाॅ.एकनाथ माले यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. दोन दिवस उपसंचालक बीडमध्ये तळ ठोकून आहेत.
जिल्हा रूग्णालयातील सुविधा, सेवा याबाबत दिवसेंदिवसे तक्रारी वाढत आहेत. मृत्यूचा आकडाही कमी होत नाही. हाच धागा पकडून लातूर विभागाचे उपसंचालक डॉ.एकनाथ माले हे दोन दिवसांपासून बीडमध्ये तळ ठोकून आहेत. शुक्रवारी दुपारी त्यांनी कोरोना वॉर्डमध्ये जावून राऊंड घेतला. यात त्यांना सर्व त्रुटीच दिसल्या. कंत्राटी डॉक्टरांवर जबाबदारी सोपवून नियमित डॉक्टर गायब होते. तसेच आहे ते डॉक्टरही रूग्णांच्या जवळ जावून विचारपूस करत नाहीत. वेळेवर जेवण येत नाही. वॉर्डमध्ये पाणी नसते. सगळीकडे घाणच घाण होती. तसेच औषधी उपलब्ध असतानाही बाहेरून आणण्यास सांगितले जाते. डॉक्टर, परिचारिका लक्ष देत नाहीत, अशा ढिगभर तक्रारी रूग्ण व नातेवाईकांनी उपसंचालकांकडे केल्या. विशेष म्हणजे याची खात्रीही डॉ.माले यांनी केली. यात त्यांना तथ्य दिसल्यानंतर रात्री उशिरा त्यांनी सर्वच डॉक्टर, अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात त्यांनी सर्वांनाच खडेबोल सुनावले. या तक्रारी कमी करायच्या असतील तर सेवा चांगली द्या. नसेल होत तर आम्ही कारवाई करू, असा दमही डॉ.माले यांनी दिला. ड्यूटी लिस्ट व नियोजन मागितल्यानंतर एकाही अधिकाऱ्याला देता आले नाही, असेही डॉ. माले म्हणाले.
....
सुधारणा होईनात, आता शासनाला अहवाल
वारंवार भेटी देऊनही सुधारणा होत नसल्याचे दिसत आहे. आता याबाबतचा सर्व अहवाल तयार करून शासनाला पाठविला जाणार आहे. तसेच जे चांगले काम करतात, त्यांचे आम्ही कायमच कौतूक करत आलोत. परंतू जे काम करत नाहीत, त्यांना नोटीस बजावून कारवाई केली जाईल, असे डॉ.माले यांनी सांगितले.
...
नियोजन कागदावर नको, प्रत्यक्षात हवे
सुविधा देण्यासाठी स्वच्छता, पाणी, ऑक्सिजन आदी २२ समित्या तयार केलेल्या आहेत. डॉक्टरांच्या ड्युटीही लालवेल्या आहेत. परंतू हे सर्व नियोजन कागदावरच दिसते. प्रत्यक्षात याची अंमलबजावणीच होत नसल्याचे सांगत प्रत्यक्षात सेवा द्या. उपाययोजना करा, अशा सुचनाही उपसंचालक डॉ.माले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
..
सीएसची होणार चौकशी
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांचे नाव असलेल्या दीप हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी कोरोनाबाधिताने आत्महत्या केली होती. या प्रकरणासह सीएस असतानाही नाव कसे, या मुद्याला अनुषंगून डॉ.गित्ते यांची चौकशी केली जाणार आहे. यासाठी इतर जिल्ह्यातील अधिकारी येतील, असेही डॉ.माले म्हणाले.
===Photopath===
220521\22_2_bed_6_22052021_14.jpeg
===Caption===
कोरोना वॉर्डमध्ये जावून उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांनी आढावा घेतला. डॉक्टर, परिचारीका, रूग्णांशी संवाद साधत प्रश्न जाणून घेतले.