ग्राउंड रिपोर्ट (सर, नीट करा ऐवजी बरे करा, असा शब्द वापरला तर...)
सोमनाथ खताळ
बी. : तीन दिवसांपासून अतिसाराचा त्रास आहे. हातपाय नुसते गळून गेलेत. दवाखान्यात गेलोत; पण फरकच पडला नाही. आता आम्हाला कोणत्या पण गोळ्या द्या, नाही तर सलाईन लावा, पण लवकर यातून निट करा, अशी विनवणी त्रस्त असलेल्या ग्रामस्थांनी आरोग्य विभागाकडे केली. तिसऱ्या दिवशीही चिंचाळा ग्रामस्थ अतिसाराच्या आजाराने त्रस्त होते. ही साथ आटोक्यात यायला किमान सात दिवस लागतील, असा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी ग्रामस्थांना दिला आहे.
वडवणी तालुक्यातील चिंचाळा गावात मागील तीन दिवसांपासून अतिसाराची साथ पसरली आहे. आरोग्य विभागाने घरोघरी जावून सर्वेक्षण करीत रुग्ण शोधून उपचार केले जात आहेत. पहिल्या दिवशी ८४, दुसऱ्या ५१ तर तिसऱ्या दिवशी ५६ रुग्ण निष्पन्न झाले होते. वाढती रुग्णसंख्या पाहून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी.पवार सकाळीच गावात पोहोचले. गावातील स्वच्छता, खासगी दवाखान्यांची तपासणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला; तसेच उपकेंद्राच्या ठिकाणीही उपचारासाठी आलेल्या रुग्णांशी संवाद साधला. यावेळी अतिसाराने हातपाय गळून गेलेल्या ग्रामस्थांनी डॉ.पवार यांच्याकडे लवकर नीट करण्याची विनंती केली. त्यांनीही उपकेंद्रातच सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या; तसेच घरोघरी जावून क्लोरीनचेही वाटप केले जात आहे.
तुम्ही बरे व्हावेत, हीच इच्छा
खासगी दवाखान्यात सलाईन लावतात. सरकारी दवाखान्यात दोन गोळ्या हातावर टेकवून परत पाठविता, असे गाऱ्हाणे ग्रामस्थांनी मांडताच डॉ.पवार संतापले. उपचाराचे काही प्रोटोकॉल असतात. तुम्ही बरे व्हावेत, हीच आमची पण इच्छा आहे. खासगी डॉक्टर पैसे उकळण्यासाठी काही पण करत असतील, असे सांगत सरकारीमध्येच उपचार घेण्याची विनंती त्यांनी केली.
खासगी डॉक्टरांकडून चुकीचा उपचार
उपकेंद्रात काही ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मधुकर घुबडे यांच्याकडे तक्रारी केल्या. यावर त्यांनी काही रुग्णांना गरज नसताना सलाईन लावून गैरसमज निर्माण केला आहे. काही रुग्णांबाबत खासगी डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याचा आरोप डॉ.घुबडे यांनी सर्वांसमक्ष केला.
महिला कर्मचाऱ्याला भोवळ
अतिसाराचे सर्वेक्षण सुरू असतानाच एका महिला कर्मचाऱ्याला भोवळ आली. तिला तत्काळ उपकेंद्रात दाखल केले. उपचार केल्यानंतर तिची प्रकृती ठणठणीत झाल्याचे सांगण्यात आले.
रुग्णसंख्या ५०० वर, नोंद केवळ १९१ ची
चिंचाळा गावात अतिसाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या ५०० पेक्षा जास्त असल्याचा संशय आहे; परंतु उपकेंद्रात आलेल्यांचीच नोंद केली जात आहे. आतापर्यंत केवळ १९१ रुग्णांची नोंद झाली आहे. उपकेंद्रात न आलेल्या लोकांचा आकडा घेतल्यास तो वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
190721\19_2_bed_14_19072021_14.jpg~190721\19_2_bed_13_19072021_14.jpeg
चिंचाळा ग्रामस्थांनी उपचाराबद्दल तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मधुकर घुबडे यांच्याकडे गाऱ्हाने मांडले.~जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी काही घरी जावून क्लोरीन वाटपाचा आढावा घेतला. सोबत डॉ.मधुकर घुबडे, सरपंच शिवाजी मुंडे उपस्थित होते.