बीड : मला माध्यमांच्या मुलाखतीमध्ये विचारले, तुमचे गुरु कोण आहेत ? तर मी माझे बाबा असे सांगते. मात्र, ते गेल्यानंतर माझे गुरु मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे आहेत. परंतु महाभारताप्रमाणे गुरुने अंगठा मागितला तरी चालेल मात्र तो अर्जुनासाठी असावा, असे म्हणत आ. विनायक मेटे यांनी केलेल्या टीकेला पंकजा मुंडे यांनी महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने आयोजित बीड येथील सभेत प्रत्युत्तर दिले. त्यामुळे पुढील काळात पालकमंत्री पंकजा मुंडे विरुद्ध आ. मेटे हा संघर्ष आणखी टोकाला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोमवारी दिवसभर महाजनादेश यात्रा बीड जिल्ह्यात आयोजित करण्यात आली होती. दुपारी कडा, आष्टी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सभा झाल्या. तसेच रॅलीच्या माध्यमातून पुन्हा जनादेश देण्याचे आवाहन यावेळी नागरिकांना करण्यात आले. दरम्यान, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी बीड तालुक्यातील काकडहिरा येथे मुख्यमंत्री व यात्रा स्वागत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. परंतु लोकसभेला मेटेंनी केलेला विरोध पाहता पंकजा मुंडे या स्वागत कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या नाहीत. त्या मुख्यमंत्र्यांच्या वाहनातच बसून राहिल्या. यावेळी आ. विनायक मेटे यांनी कोणी काहीही केले तरी आमची भाजपसोबत असलेली युती कायम राहील असा विश्वास व्यक्त केला. तसेच यात्रेच्या निमित्ताने घटक पक्ष म्हणून स्वागत करणे आमचे कर्तव्य देखील असल्याचे ते म्हणाले.
मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी विनायक मेटे यांच्या स्वागत कार्यक्रमामध्ये जाऊ नये अशी पंकजा मुंडे यांची इच्छा होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी स्वागत कार्यक्रम स्वीकारला. दरम्यान, त्या कार्यक्रमातून पंकजा मुंडे यांच्यावर होत असलेली टीका पाहता त्या तेथून शासकीय विश्रामगृहात आल्या. मुख्यमंत्री विश्रामगृहामध्ये आल्यानंतर त्यांच्यात या विषयावर चर्चा झाल्याचीही सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे बीड येथील कार्यक्रमाला देखील एक तास उशीर झाला. भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी प्रास्ताविकात आ. विनायक मेटे यांच्यावर टीका करीत ते भुरटे असून, लोकसभा निवडणुकीच्यावेळी त्यांनी मराठा समाजात तेढ निर्माण करुन खा. प्रीतम मुंडे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. तसेच मागच्या वेळी बीडची जागा ही प्रामाणिक माणसाला दिली असती तर ती निवडून आणली असती असे पोकळे म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पंकजा मुंडे, खा. प्रीतम मुंडे, आ. सुरजितसिंह ठाकूर, आ. संगीता ठोंबरे, आ. सुरेश धस, आ. आर. टी. देशमुख, आ. लक्ष्मण पवार, आ. भीमराव धोंडे, जि.प. अध्यक्ष सविता गोल्हार, माजी आ. आदिनाथ नवले, केंद्रे, केशव आंधळे, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, राजेंद्र मस्के, स्वप्नील गलधर, आदित्य सारडा, अशोक लोढा यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
मी भीती वाटावी असे निर्णय घेत नाही
पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, लोकांचा चेहरा दिसल्याशिवाय मला राजकारण करता येत नाही. विविध निर्णय घेताना मी कार्यकर्त्यांचा विचार करते. मुंडे साहेब गेले त्याच्यानंतर २ ते ३ दिवसातच मुख्यमंत्री फडणवीस भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी आमच्या दोघात चर्चा होऊन देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावे असे मी म्हणाले होते. ते आम्ही सिध्द करुन दाखविले. तुम्ही एकदा नाही तीनदा मुख्यमंत्री व्हा, आमची साथ आहे, असे पंकजा यावेळी म्हणाल्या. परंतु एका जाहीर कार्यक्रमात आ. आर. टी. देशमुख यांना शिवीगाळ केल्यामुळे मेटे यांचे नाव न घेता त्यांच्याशी मतभेद असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री हे आमचे नेते असून तुम्हाला असुरक्षित वाटणार नाही, यासाठी निश्चित राहा. मी भीती वाटावे असे निर्णय राजकारणात घेत नाही. जिल्ह्यात सर्व आमदार भाजपाचेच निवडून आणायचे आहेत. राष्ट्रवादी नेस्तनाबूत करायची आहे, असे त्या म्हणाल्या.
प्रीतम मुंडेंची टीकायावेळी प्रीतम मुंडे यांनी देखील आ. मेटे यांच्यावर टीका करीत लोकसभा निवडणुकीदरम्यान जातीवाचक प्रचार करण्यात आल्याचे सांगितले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करतात परंतु स्त्रीचा सन्मान करीत नाहीत, अशांना त्यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. लोकसभेत निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार त्यांनी मानले.