कडा : पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिल्यावर ती नोंदवून घेण्यास होणारी टाळाटाळ, त्यावर कार्यवाही करण्यास होणारा विलंब यामुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर अनेकदा टीका होते. मात्र, तत्परतेचा प्रत्यय येथे ९ सप्टेंबर रोजी आला. थकलेल्या वयोवृद्धाची ठाण्याच्या प्रवेशद्वारावर जाऊन कैफियत जाणून घेत ठाणेप्रमुखांनी तातडीने त्यांचा तक्रार अर्ज निकाली काढला. तालुक्यातील करंजी येथील मारुती आबा आजबे या वयोवृद्ध आजोबांचे शेजारील लोकांसोबत शेतीच्या बांधावरून वाद झाले. यात त्यांना मारहाण झाली. त्यांनी आष्टी ठाण्यात धाव घेतली. आजोबा रिक्षातून उतरले; पण चालता येत नसल्याने ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच बसले. दालनात बसलेले पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या नजरेस ते पडले. त्यांनी आजोबांची धडपड पाहून ताडकन उठून तिथे जाऊन त्यांची विचारपूस केली. शिवाय, त्यांना आधार देत त्यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा नोंदवून संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे फर्मान सोडले. हवालदार मुदस्सर शेख यांनी तक्रार नोंदवून घेत कार्यवाही पूर्ण केली. त्यामुळे आजोबांना पोलिसांचा सुखद अनुभव आला. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी शिंदेवाडी येथील आजीबाईला संपत्तीच्या वादातून घरातील लोक मारहाण करत. तेव्हा आजीबाईला न्याय देऊन आधार देण्याचे काम केले होते. त्यामुळे वर्दीतील त्यांचे कौतुक होत आहे.
आजोबांना धीर देत घेतली तक्रार नोंदवून - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 4:38 AM