अंबाजोगाई (बीड) : येथील ‘मानवलोक’ संस्थेचे कार्यवाह तथा प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते अनिकेत लोहिया यांना भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्याच्यावतीने दिला जाणारा "जलप्रहरी" पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण ३० मार्च रोजी दिल्ली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
जल शक्ति मंत्रालयाच्यावतीने जल संसाधन,नदी विकास व गंगा संरक्षणासाठी काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांच्या कार्याची दखल घेऊन " जल प्रहरी " हा सन्मानाचा राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो.यावर्षीचा हा पुरस्कार महाराष्ट्रात मानवलोक चे कार्यवाह अनिकेत द्वारकादास लोहिया यांना ३० मार्च रोजी दिल्ली येथे एका समारंभात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
डॉ. द्वारकादासजी लोहिया यांनी चार दशकांपूर्वी ‘मानवलोक’ संस्थेच्या माध्यमातून मराठवाड्यात दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न सुरु केले. जलसंधारणाची कामे करून त्यांनी अनेक गावे दुष्काळमुक्त केली. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत अनिकेत लोहिया यांनी मागील बारा वर्षांत भूजल पुनर्भरण आणि पृष्ठभागाची पाण्याची क्षमता सुधारण्यासाठी विशेषतः ‘पाणलोट विकासासाठी’ जल क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम केले. मराठवाड्यातील जलप्रकल्पातील गाळ काढून पाणीसाठा कसा वाढेल याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. त्यांच्या कार्याची दखल घेत यापूर्वी भारत सरकारच्या जल शक्ती मंत्रालयाने त्यांची ‘जलयोद्धा’ पुरस्कार प्रदान केला आहे. तर महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण यांच्या नावे दिला जाणारा "जलनायक" हा पुरस्कार ही त्यांना प्राप्त झाला आहे.
अनिकेत लोहिया हे जागतिक पाणी परिषदेचे सदस्य आहेत.लोहिया यांनी जलसंधारणा च्या कामासोबतच ,धरण,तलाव,नद्या खोलीकरण, विस्तारीकरण व गाळमुक्त करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी मोहीमा राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना जलप्रहरी हा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल पुणे येथील प्रसिद्ध उधोजक रसिक कुंकुलोळ, प्रितेश कुंकुलोळ,सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा,व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.