परळी: शिव म्हणजे प्रभू वैद्यनाथ, शक्ती म्हणजे माता पार्वती आणि भक्तीचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे संत जगमित्र नागा महाराज असा त्रिवेणी संगम असलेले प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थ क्षेत्राचा महिमा अगाध असून, हे साक्षात भू-कैलास असल्याचे प्रतिपादन गोपाळ महाराज आंधळे यांनी केले. येथील औद्योगिक वसाहत सभागृहात नगरसेवक चंदुलाल बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या गणेशोत्सवात विविध उपक्रम, धार्मिक कार्यक्रम होत आहेत. मंगळवारी गोपाळ महाराज आंधळे यांचे ऑनलाईन व्याख्यान झाले.
परळी येथील प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थ क्षेत्राचा महिमा विषद करतांना अनेक ऐतिहासिक कथा सांगत आंधळे महाराज यांनी भाविकांच्या डोळ्यासमोर साक्षात प्रसंग उभा केला. भगवान गणेशांची जन्मभूमी ही पूर्वीचे प्रभाकर क्षेत्र म्हणजेच आजचे परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र असल्याचे ते म्हणाले. हा कार्यक्रम ऑनलाईन असल्याने हजारो भाविकांनी घरबसल्या श्रवणाचा लाभ घेतला.
या आख्यानास माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, संयोजक चंदुलाल बियाणी, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अभयकुमार ठक्कर, प्रा. अतुल डुबे, ह. भ. प. रामेश्वर महाराज कोकाटे, म. सा. प.चे प्रा. यल्लावाड, अनंत मुंडे, ह. भ. प. विजयानंद महाराज आघाव, संभाजी मुंडे, मोहनराव व्हावळे, शौकत पठाण, संजय मुकदम, अमोल टेकाळे, हनुमंत आगरकर आदी उपस्थित होते.